उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 11:39 PM2024-08-10T23:39:36+5:302024-08-10T23:40:37+5:30
राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले.
अजित मांडके
ठाणे - एकीकडे ठाण्यात शनिवारी रात्री उबाठा सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचा भगवा सप्ताह निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. तर दुसरीकडे त्याच वेळेस ठाण्यातील आनंद आश्रम येथे उबाठा सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अनिता बिर्जे या उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत ठाम होत्या. त्यामुळे त्यांना महिला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीपासून बिर्जे या उबाठा सेनेसोबत फारशा दिसून येत नव्हत्या. अखेर शनिवारी रात्री त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करुन उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीच्या खेटा - एकनाथ शिंदे यांची टीका
पूर्वी दिल्लीतले नेते मातोश्रीच्या पटांगणात येत होते. मात्र आता मातोश्रीच दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत, मला मुख्यमंत्री करा म्हणून खेटा घालत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
सरकार स्थापन झाल्यापासून सरकार परिणाम म्हणून पडणार म्हणून अशी ओरड करत आहेत मात्र आता सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाले अद्यापही सरकार टिकून आहे. कारण आम्ही बाळासाहेब आणि दिघे साहेबांची विचार सोडलेले नाहीत म्हणूनच आमचे सरकार टिकून आहे असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला सुपारी फेकली गेली आणि ॲक्शनला रिएक्शन ही असतेच परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत याचे समर्थन होऊ शकणार नसल्याचेही ते म्हणाले. परंतु ज्यांनी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावला.