ठाकरेंना पोलिसांना अडवले; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:42 PM2023-11-11T18:42:08+5:302023-11-11T18:42:56+5:30
या नेभळटांना कुणीही थारा देऊ नका, सरकार आपल्या दारी, ते दारात आले तर तुम्ही इज्जत देणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
ठाणे – मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून पाडण्यात आली. त्यानंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरे स्वत: या शाखेला भेट देण्यासाठी येणार होते. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी शाखेच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू केली. अशातच मुख्यमंत्री शिंदे गटाचेही कार्यकर्ते तोडलेल्या शाखा परिसरात जमले होते. इथं ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात राडा होऊ नये म्हणून पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.
उद्धव ठाकरे ज्यावेळी मुंब्रा इथं आले तेव्हा ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. तर शिंदे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना विरोध करण्यासाठी आले होते. या कार्यकर्त्यांनी ठाकरेंना काळे झेंडे दाखवले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. ठाकरे शाखेच्या जवळ येताच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी मला शाखेजवळ जाऊ द्या असं ठाकरेंनी म्हटलं. परंतु पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत उद्धव ठाकरेंना पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे काही वेळ गाडीतच बसून राहिले. त्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, नेभळटांना मी सांगतो, तुमची जी मस्ती आहे, आमची पोस्टर्स फाडली, निवडणुका येऊ द्या आम्ही तुमची मस्ती फाडतो, शाखाचोरांचे रक्षण केल्याबद्दल पोलिसांचे आभारी आहोत. प्रशासन हतबल झालंय, आज काही घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. खरा बुलडोझर काय असतो हे दाखवायला इथं आलोय, खोके सरकारनं आमची शाखा पाडली, जागेवर अतिक्रमण केलंय, ते लवकर काढा, निकाल लागत नाही तोवर ते डबडे तिथे ठेऊ नका, पोलीस बाजूला ठेवा आणि या समोर असं आव्हान त्यांनी शिंदेंना दिले.
तसेच तुम्ही मर्दांची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवा, आमच्याशी भिडा, तुमच्या सोबतीने तिथे गेलो, जर केसाला जरी धक्का लागला असता तर उभ्या महाराष्ट्रात यांचे केस राहिले नसते. मी मुंब्र्यात खूप दिवसांनी आलोय. जो कारभार सुरू आहे तो मंजूर आहे का? चोरांच्या हातात तुमचे भवितव्य देणार का? निवडणूक कोणतीही येऊ द्या, गद्दारांचे डिपॉझिट महापालिकेपासून लोकसभेपर्यंत जप्त झाले पाहिजे. हे गद्दार खूप दिवस राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, या नेभळटांना कुणीही थारा देऊ नका, सरकार आपल्या दारी, ते दारात आले तर तुम्ही इज्जत देणार का? मी लढायला तयार आहे, लढण्यासाठी मैदानात उतरलोय, मी लढायला आलो किती लोकं सोबत येतील हे पाहायला आलो. भाड्याची माणसे घेऊन तुम्ही आलात, पोलिसांनी आज चोरांचे रक्षण केलंय, तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलेत, त्यामुळे आता या मधमाशा कुठे डसतील हे सांगता येणार नाही, उद्यापासून माझे शिवसेनेचे शाखाप्रमुख चौकात जाऊन बसतील, त्याच्या जवळ जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.