उद्धव ठाकरेंचे घरच टक्केवारीतून सुरू - नीलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:29 AM2018-11-06T06:29:06+5:302018-11-06T06:29:19+5:30
उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे.
ठाणे - उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे. महाराष्टÑातून ठाकरेंना राणे कुटुंब संपविणे आतापर्यंत जमले नाही, तर तिकडे गोवा सरकार राणे कुटुंब संपविण्याचे स्वप्न बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी राणे यांनी ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाण्यात ज्यांची सत्ता आहे, त्यांनी आतापर्यंत किती विकासाची कामे केली? टक्केवारीचे राजकारण करण्यापलीकडे येथील सत्ताधाऱ्यांनी काहीच न केल्याचा आरोपही त्यांनी केला. आयुक्तांना भेटून वागळे स्मशानभूमीचा मुद्दा मार्गी लावावा. थीम पार्क गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, मनोरुग्णालयाच्या जागेचा तिढा सोडवावा, अशा मागण्यांचे निवेदन दिल्याचे सांगितले. यावर योग्य कारवाई झाली नाही, तर फटाके काय येथे तोफा फोडल्या जातील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
भूमिकेविषयी संशय
प्रकाश आंबेडकर सध्या जी काही भूमिका घेत आहेत, त्यातून केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचेच कारस्थान त्यांच्याकडून सुरू असल्याचे दिसत आहे. ज्या दिवशी त्यांनी ओवेसीबरोबर घरोबा केला, तेव्हापासूनच त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याने महाराष्टÑाने सावध व्हावे, असेही त्यांनी सांगितले.