उल्हास नदीच्या घाटाचे काम ठप्प; रवींद्र चव्हाणांच्या हस्ते झालं होतं उद्धाटन
By सदानंद नाईक | Published: October 23, 2023 04:49 PM2023-10-23T16:49:46+5:302023-10-23T16:50:17+5:30
उल्हास नदी घाटाला एक नव्हेतर तीन नावे दिल्याने, स्थानिक नागरिकांनी सुरवातीला आक्षेप घेतला होता.
उल्हासनगर : नामकरणावरून वादात सापडलेल्या उल्हास नदी घाटाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प पडल्याचे चित्र आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नदी घाटाच्या कामाचे आमदार कुमार आयलानी यांनी धुमधडाक्यात उदघाटन करून इतर पक्षाला शह दिला होता.
उल्हासनगरवासीयांनाही हक्काचे नदी घाट हवा, या संकल्पनेतून आमदार कुमार आयलानी यांनी आमदार निधी व शासनाच्या मूलभूत सुखसुविधा निधीतून कॅम्प नं-१, रिजेन्सी-अंटेलिया येथील उल्हास नदी किनारी घाटाच्या काम सुरू केले. घाटासह गार्डन व मुलांना व वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गेल्या पावसाळ्यापूर्वी घाटाच्या कामाचे उदघाटन करून काम सुरू केले होते. दरम्यान पावसाळ्यामुळे ठप्प पडलेले काम ऑक्टोबर महिन्यातही बंद असल्याने, घाटाच्या कामाबाबत चर्चेला उत आला. महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी घाटाचे काम बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उल्हास नदी घाटाला एक नव्हेतर तीन नावे दिल्याने, स्थानिक नागरिकांनी सुरवातीला आक्षेप घेतला होता. तसेच नदी घाटाचे काम सुरू केल्याने, असंख्य झाडांची कत्तल केल्याचा आरोप-प्रत्यारोप होत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी घाटाच्या बांधणीसाठी आमदार निधी दिला असून शासनाचा मूलभूत सुखसुविधा अंतर्गत निधी देण्यात आला असून ४ ते ५ कोटीच्या निधीतून उल्हास नदी घाट बांधण्यात येणार आहे. मात्र नदीवरील घाटाला महापालिकेसह इतर विभागाची मंजुरी मिळाली का? असा प्रश्नही विचारला जात आहे. नदीवर घाट झाल्यास, नागरिकांना एक चांगलीं वास्तू मिळणार आहे. मात्र घाटाचे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची मागणी होत आहे.
सणासुदीमुळे काम बंद... आमदार आयलानी
उल्हास नदी घाटाचे काम वेळेत पूर्ण करणार असून निधी कमी पडल्यास शासनाकडून आणणार असल्याचे आमदार आयलानी म्हणाले. तसेच घाटाचे काम सणासुदीमुळे बंद असावे. असा अंदाज आयलानी यांनी व्यक्त केला.