उल्हास नदीला रासायनिक पाण्याचा विळखा, जीन्स कारखान्यांचे लोण कर्जतमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:41 AM2018-12-27T03:41:21+5:302018-12-27T03:42:12+5:30
ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये जीन्स बनवणारे सगळ्यात जास्त कारखाने होते. या जीन्स धुण्यासाठी बेसुमार पाण्याचा व रसायनांचा वापर केला जातो.
- कांता हाबळे
नेरळ : ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये जीन्स बनवणारे सगळ्यात जास्त कारखाने होते. या जीन्स धुण्यासाठी बेसुमार पाण्याचा व रसायनांचा वापर केला जातो. हे रसायनमिश्रित पाणी आरोग्यास घातक असते. शिवाय ते पाणी विल्हेवाट लावण्यासाठी जवळील नाल्यात सोडले जाते. याच पद्धतीने उल्हास नगरातील वालधुनी नदीचे रूपांतर दुर्गंधीयुक्त नाल्यात झाले. प्रदूषण होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर बंदी आणली. त्यानंतर कारखाने मालकांनी चलाखी करत प्रदूषणाचे लोण थेट कर्जत तालुक्यात आणले आहे.
उल्हासनगरमध्ये जीन्स तयार करण्याचे हजारो कारखाने जोमात सुरू होते. या कारखान्यांमध्ये जीन्स धुण्यासाठी वापरले जाणारे बेसुमार पाणी आणि रसायन हे वापरून झाल्यानंतर ते जवळील नदीत सोडले जात होते. नदी प्रदूषणामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागल्यावर न्यायालयाने कारखान्यांवर बंदी आणली.
उल्हासनगरातून जीन्स कारखान्यांना हद्दपार केल्यावर त्यांनी आपली दुकाने अंबरनाथ परिसरात थाटली. मात्र तेथेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांनी कारखाने बंद करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड अधिकारी आणि अंबरनाथ नगरपरिषदेने व पोलीस प्रशासन यांनी उद्योग तत्काळ बंद करण्याच्या नोटीस दिल्या. त्यामुळे जीन्स कारखान्याच्या मालकांनी कर्जत तालुक्यात नदीकिनारी आपले कारखाने सुरू केले आहेत. जीन्सचे कारखाने सुरू करताना निर्जन स्थळ आणि आसपास नदी अशी ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी एक कारखाना जिते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नेरळ पाणी योजनेच्या बाजूलाच सुरू करण्यात आला आहे. तर दुसरा निकोप गावाजवळ सुरू करण्यात आला आहे. या कारखान्यांना स्थानिक ग्रामपंचायतींनी कारखाने सुरू करण्यासाठी ना हरकत दाखले दिल्याचेही समोर येत आहे.
कारखान्यात काम करण्यासाठी बाहेरील राज्यातून कामगार मागवण्यात आले आहेत. त्यांचे कोणतेही रेकॉर्ड पोलीस ठाण्याकडून तपासण्यात आले नाहीत, तर दुसरीकडे कारखान्यातील सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते.
उल्हास नदीच्या पाण्यावर शेकडो पाणी योजना सुरू आहेत. अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लांट नाहीत. त्यामुळे रसायनमिश्रित पाण्यामुळे भविष्यात एका किंवा अनेक गावात विषबाधा होण्यासारखी गंभीर घटना घडू शकते. स्थानिक प्रशासन याबाबतीत दुर्लक्ष करीत असल्याने प्रदूषण नियंत्रण महामंडळ या ठिकाणी लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत तालुक्यात जीन्स कारखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यातून निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जाते. यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. भविष्यात यामुळे खूप मोठी दुर्घटना घडू शकते.
- राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, जिते