उल्हास नदी संशोधनासाठी विद्यापीठाचा तत्त्वत: होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:37 PM2019-11-16T23:37:08+5:302019-11-16T23:37:16+5:30

नदी बचाव कृती समितीचा पाठपुरावा; जैवविविधतेचा अभ्यास होण्याची गरज, आता प्रतीक्षा अंतिम होकाराची

Ulhas River's principle of research for the Ulhas River | उल्हास नदी संशोधनासाठी विद्यापीठाचा तत्त्वत: होकार

उल्हास नदी संशोधनासाठी विद्यापीठाचा तत्त्वत: होकार

googlenewsNext

- मुरलीधर भवार 

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी ४८ लाख नागरिकांची तहान भागविते. ती राजमाचीपासून ते कल्याण खाडीपर्यंत नदीच्या किनारी असलेली शेती व निसर्ग फुलवते. त्यामुळे उल्हास नदीचे संशोधन केले जावे, अशी मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने राज्यपाल व मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली होती. त्यानुसार, नदीच्या संशोधनासाठी विद्यापीठ प्रशासनाने तत्त्वत: होकार दिला आहे. याविषयी बैठक घेऊन त्याचा निर्णय लवकर घेतला जाईल, असे समितीला कळविले आहे.

राजमाचीच्या डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी कल्याण खाडीला येऊन मिळते. पुढे ती समुद्राला जाऊन मिळते. या नदीची लांबी १२२ किलोमीटर आहे. या नदीवर मोहने बंधारा आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून महापालिका पाणी उचलते. तर, एमआयडीसीच्या जांभूळ केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. उल्हास पंपिंग हाउस शहाडनजीक आहे. बदलापूर येथे विनादरवाजा पाणबुडी पद्धतीचे लहानसे बॅरेज धरण आहे. ठाण्याची स्टेम पाणीपुरवठा योजनाही या नदीवर आहे. मात्र, ४८ लाख लोकांची तहान भागविणारी ही नदी प्रदूषित होत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण येथे नदी प्रदूषित होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून ‘वनशक्ती’ पर्यावरण संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे. तसेच नदी प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही न्यायप्रविष्ट आहे.

नदी वाचवण्यासाठी वर्षभरापासून उल्हास नदी बचाव समिती काम करत आहे. समितीचे सदस्य रवींद्र लिंगायत म्हणाले की, नदी वाचवण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना कल्याण उपकेंद्रात निवेदन दिले होते. विद्यापीठाने समुद्राविषयी (ओशोनोग्राफी) अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यात उल्हास नदी संशोधनाचा प्रकल्प विद्यापीठाने हाती घ्यावा, असे आम्ही सुचविले होते.

उल्हास नदीत पूर्वी पाला नावाचा मासा मिळत होता. मात्र, आता तो दुर्मीळ झाला आहे. या नदीतील जैवविविधता अभ्यासली गेली पाहिजे. बदलापूर येथे नदीला एका कातळाने काप दिला आहे. तेथे नदी चक्क काटकोनी वळण घेते. जगातील कोणत्याच नदीला काटकोनी वळण नाही. नदीच्या पाण्यात काही रासायनिक घटक असून, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे.

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रातील ओशोनोग्राफी अभ्यास शाखेने नदीचे संशोधन केल्यास हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरेल, असा दावा समितीने केला आहे. समितीच्या पाठपुराव्याच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने कळविले की, हा पर्याय चांगला असून, त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. त्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, समितीला विद्यापीठाच्या अंतिम होकाराची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्था पाठपुरावा करीत आहेत. या संस्थांकडे पैशांचे पाठबळ नाही. सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी प्रदूषित करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांना काडीमात्र चाप बसत नाही. नदी संवर्धनासाठी नियंत्रण मंडळाचा पुढाकार नाही. केंद्राकडून नदी प्रदूषणासाठी जाहीर होणारे पॅकेज उत्तरेकडील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी खर्च केले जाते. त्या पॅकेजचा पैसा महाराष्ट्रातील नद्यांच्या सुधारणांसाठी येतच नाही.

आश्वासन हवेतच विरले
उल्हासनगरातील चांदीबाई मनसुखानी कॉलेजने १० वर्षांपूर्वी सर्वाधिक प्रदूषित असलेल्या वालधुनी नदीचा ‘सेव्ह गुड अर्थ’ या नावाने अभ्यास अहवाल तयार केला होता. तो विद्यापीठासह सरकारदरबारी सादर केला होता. तेव्हा तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी वालधुनीचे पाणी उल्हास नदीला जाऊन मिळते, ते रोखण्याचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी एक जाळे तयार केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ती घोषणा हवेत विरली आहे.

Web Title: Ulhas River's principle of research for the Ulhas River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.