उल्हासनगरमधील कपडा व्यापाऱ्याच्या खुनाचा उलगडा, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 10:40 AM2018-08-29T10:40:12+5:302018-08-29T10:59:24+5:30
कपडे धुण्याच्या धोपटण्याने कपडा व्यापाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेचा उलगडा झाला आहे.
उल्हासनगर : कपडे धुण्याच्या धोपटण्याने कपडा व्यापाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी एका पेंटरला अटक केली असून अवघ्या 9 हजारासाठी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं.3 परिसरातील राहत्या घरी कपडा व्यापारी प्रकाश काच्छानी यांची 9 ऑगस्ट रोजी हत्या झाली होती. कपडे धुण्याच्या धोपटण्याने डोक्यावर प्रहार करून हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी मुंबईच्या खार भागातून संजय शर्मा याला तब्बल 19 दिवसांनी अटक केली. संजय हा पेशाने पेंटर असून तो मूळचा बिहार राज्यातला आहे. त्याची मृत व्यापारी प्रकाश काच्छानी यांच्याशी ओळख होती. तसेच एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.
9 ऑगस्ट रोजी प्रकाश राहत्या घरी न जाता चोपडा कोर्ट परिसरातील जुन्या घरी जाऊन झोपी गेला. संजय शर्मा नेहमीप्रमाणे जुन्या घरी गेला असता प्रकाश झोपलेल्या अवस्थेत होता. पैशाच्या आमिषाने संजय याने बाथरूममध्ये असलेल्या कपडे धुण्याच्या धोपटण्याने, झोपलेल्या प्रकाशच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून, खिशात असलेले 9 हजार रुपये आणि मोबाईल घेऊन पसार झाला. प्रकाश काच्छनी यांची अवघ्या 9 हजारासाठी हत्या केल्याची कबूली संजय शर्मा यांनी पोलिसांना दिली. संजय याला बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करीत आहे.