उल्हासनगरात १२४ झाडे उन्मडून पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:35+5:302021-05-19T04:41:35+5:30
उल्हासनगर : शहराला ‘तौउते’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून, १२४ पेक्षा जास्त झाडे उन्मडून पडली. झाडे उचलण्याचे काम अग्निशमन ...
उल्हासनगर : शहराला ‘तौउते’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून, १२४ पेक्षा जास्त झाडे उन्मडून पडली. झाडे उचलण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करीत असून, इमारती व घरांवरील लोखंडी पत्रे जोरदार वाऱ्याने उडून गेले. गांधी रोडला रिक्षावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, महापालिकेच्या पथकाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास मंगळवारपासून सुरुवात केली आहे.
झाड विजेच्या खांबावर पडल्याने ते पडून विजेच्या तारा तुटल्या आहेत. गेल्या २४ तासांपासून शहरातील बहुतांश भागांतील वीज गायब आहे, तसेच इंटरनेट सेवाही ठप्प पडली आहे. विजेचे खांब व तुटलेल्या तारा दुरुस्ती करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. विनापरवाना इमारतीवर उभारलेले अनेक लोखंडी पत्राचे शेड जोरदार वाऱ्याने उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर झाडे घरावर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले.
कॅम्प नं ५ गांधी रोड येथील जय बाबाधामसमोर एक जुने झाड रिक्षावर पडून लखुमल कामदार (६२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोरे नावाचा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. सरकारच्या आपत्कालीन निधीतून मृत्यू व जखमीला मदत देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविल्याची माहिती पालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.