जोरदार पावसानं उल्हासनगरात ४३ झाडे पडली, तर २३ घरांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:21 PM2020-06-04T17:21:37+5:302020-06-04T17:40:01+5:30
काही झाडे विद्युत तारा व घरावर पडल्याने अनेक ठिकाणची वीज रात्री उशिरापर्यंत गुल होती.
उल्हासनगर : संततधार पावसाने शहराला झोडपले असून, कालपासून आजपर्यंत ४३ झाडे उन्मळून पडली. तर २३ घराचे अंशतः नुकसान झाले. गुलशन नगर, फर्निचर मार्केट, शहाड फाटक आदी ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून घरात पाणी गेले आहे. उल्हासनगरला संततधार पावसाने झोडपले असून, दोन दिवसांत एकूण ४३ झाडे उन्मळून पडली. काही झाडे विद्युत तारा व घरावर पडल्याने अनेक ठिकाणची वीज रात्री उशिरापर्यंत गुल होती. तर २३ घराचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांनी दिली.
व्हीटीसी मैदान, आरजीएस शाळा, दुर्गापाडा, कैलास कॉलनी, शहाड फाटक आदी ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कॅम्प नं -३ फर्निचर मार्केट मधील नाली तुंबल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येवून अनेक दुकानात पाणी घुसले. गुलशन नगर व शहाड फाटक येथेही नाली तुंबून अनेक घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांनी वीज मंडळाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात कालपासून आजपर्यंत ४३ झाडे तर अनेक ठिकाणी नाली तुंबून पाणी घरात घुसल्याच्या घटना घडल्या असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केली. ७० टक्केपेक्षा जास्त नालेसफाईचे काम झाल्याने, नाले तुंबल्याच्या घटना एकदा अपवाद वगळता घडल्या नसल्याची प्रतिक्रिया मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली. मात्र ५ कोटीच्या निधीतून रस्त्यातील खड्डे भरणे, रस्त्याची दुरुस्ती करण्याची निविदा काढूनही कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांना खड्ड्याच्या रस्त्याचा सामना यावर्षी करावा लागणार आहे.