उल्हासनगर विधानसभा : ५० हजार मतदार वगळले जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:51 PM2018-06-23T23:51:55+5:302018-06-23T23:52:11+5:30
उल्हासनगर विधानसभा मतदारयादीतील फोटो नसलेल्या तब्बल ५० हजार मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभा मतदारयादीतील फोटो नसलेल्या तब्बल ५० हजार मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोटो नसलेल्या मतदारांनी सात दिवसात फोटो व पुराव्यासह तहसील कार्यालयात यावे असे आवाहन तहसीलदार उत्तम कुंभार यांनी केले आहे.
उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील मतदारयादी बनवण्याचे काम अंतिम टप्यात आहे. बीएलओच्या सर्वेक्षण व पंचनाम्यानुसार निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी प्रसिध्द केली असून नवीन यादीत ५० हजार ४१ मतदारांचे फोटो नाहीत. फोटो नसलेल्या मतदारांचीयादी तयार करून ती तहसीलदार कार्यालयाने प्रसिध्द केली. फोटो नसलेल्या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनी फोटो व पुराव्यासह नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांनी नोंदणी न केल्यास नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल असे कुंभार यांनी सांगितले.
उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात यापूर्वी एकूण सव्वातीन लाख मतदार होते. मात्र मतदारयादीच्या सर्वेक्षणानंतर ४० हजारापेक्षा जास्त मतदार वगळण्यात आले. यावर्षीही ४० हजारपेक्षा अधिक मतदार वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपविभागीय अधिकारी जगजिंतसिंग गिरासे यांच्या देखरेखीखाली अद्ययावत मतदारयाद्या बनवण्याचे काम सुरू आहे.