उल्हासनगर बडोदा बँकेत बॉम्बची अफवा; पोलिसांनी केली एकाला अटक
By सदानंद नाईक | Published: February 2, 2024 06:50 PM2024-02-02T18:50:57+5:302024-02-02T18:51:12+5:30
उल्हासनगर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक पथकाला माहिती दिल्यावर पथकाने बँकसह परिसराची पाहणी केली
उल्हासनगर : कॅम्प नं-३, नेहरू चौकातील बडोदा बँकेत बॉम्ब असल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यावर, पोलीस अलर्टवर येऊन बँकसह परिसराची बॉम्ब शोधक पथकाने झाडाझडती घेतली. याप्रकरणी एका कॉलेज तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे बडोदा बँक असून बँकेत बॉम्ब असल्याची माहिती अज्ञात कॉलद्वारे सकाळी १० वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. उल्हासनगर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक पथकाला माहिती दिल्यावर पथकाने बँकसह परिसराची पाहणी केली. झाडाझडती मध्ये काहीएक मिळून आले नाही. बॉम्बची अफवा असल्याची खात्री झाल्यावर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिलेल्या मोबाईल नंबरचा शोध घेतला. शिवाजीनगर कल्याण मधील एका कॉलेज तरुणांचा मोबाईल नंबर असल्याचे उघड केल्यावर, पोलिसांनी तरुणाला अटक केली. बँकेत त्याचे काम झाले नसल्याच्या रागातून त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब असल्याचा खोटा फोन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी तरुणाला अटक करून गुन्हा दाखल केल्याची माहिती देऊन बॉम्बची अफवा असल्याची माहिती दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत