सेनेशी युतीचा आयलानींना फायदा, भाजपा फुटीची शक्यता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:40 AM2018-05-08T06:40:05+5:302018-05-08T06:40:05+5:30
पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे नेते कुमार आयलानी यांना शिवसेनेसोबतच्या युतीचा सर्वाधिक फायदा होईल, असे सध्याचे चित्र असून सिंधी मतांत फाटाफूट नको म्हणून साई पक्षाला सत्तेतून बाजूला केले तरी भाजपा तूर्त त्यांची साथ कायम ठेवण्याची चिन्हे आहेत.
उल्हासनगर : पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे नेते कुमार आयलानी यांना शिवसेनेसोबतच्या युतीचा सर्वाधिक फायदा होईल, असे सध्याचे चित्र असून सिंधी मतांत फाटाफूट नको म्हणून साई पक्षाला सत्तेतून बाजूला केले तरी भाजपा तूर्त त्यांची साथ कायम ठेवण्याची चिन्हे आहेत. या राजकीय घडामोडींत भाजपाने एकाकी पाडलेले ओमी कलानी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता असून स्थानिक नेत्यांचा विरोध असला तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यास त्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ओमी यांच्या गटाचे नगरसेवक भाजपा सोडण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्या पक्षात फूट पडण्याची शक्यता मावळली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात उल्हासनगरचे महापौरपद आपल्या कुटुंबात राखण्यात आयलानी यशस्वी झाले असून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याने एकाच कुटुंबात दोन महत्त्वाची पदे राहणार आहेत.
ज्योती कलानी यांच्याऐवजी ओमी कलानी विधानसभेची निवडणूक लढवणार हे नक्की झाल्याने ते अपक्ष म्हणून लढतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध होऊ शकतो, पण त्या ताकदीचा अन्य उमेदवार पक्षाकडे नसल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने त्यांना पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दिली जाईल, असे मानले जाते. त्यामुळे आयलानी विरूद्ध कलानी अशीच लढत पुन्हा शहरात पाहायला मिळेल.
साई पक्षाची भूमिका निर्णायक
उल्हासनगरच्या सत्तेसाठी भाजपाने जसा ओमी कलानी यांचा वापर करून घेतला, तसाच आपलाही वापर झाल्याची भावना साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांचीही आहे.
भाजपा-शिवसेनेची युती झाल्यावर इदनानी यांच्या वाट्याला फारसे काही येणार नाही. त्यातही इदनानी हे पूर्वीचे पप्पू कलानी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
मध्येतरीचे वाद मिटवून त्यांनी ओमी कलानी यांना मदत केली, तर ते आयलानी यांनी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सत्तेतून बाजूला केले तरी साई पक्षाला किमान वर्ष-दीड वर्षे सांभाळण्याचेच आयलानी गटाचे धोरण आहे.
लोकसभा-विधानसभेची युतीमध्ये देवाणघेवाण?
गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत साई पक्षाने ज्योती कलानी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे कुमार आयलानी यांचा अवघ्या १८०० मतांनी पराभव करत त्या निवडून आल्या. शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनी २२ हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती.
त्यापूर्वीच्या निवडणुकीत साई पक्षाने कुमार आयलानी यांना पाठिंबा दिल्याने आयलानी विजयी, तर पप्पू कलानी पराभूत झाले होते. यावेळी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे अॅड. संभाजी पाटील यांनी १० हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती.
त्यामुळे साई पक्षाला सांभाळतानाच शिवसेनेने चांगला उमेदवार देऊ नये, असा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजे डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत करतो, त्या बदल्यात शिवसेनेने विधानसभेला मदत करावी, अशी तडजोड युतीत झाल्याची चर्चा आहे.