उल्हासनगरात भाजपा-ओमी टीम समर्थक नगरसेवक साथ साथ, शिवसेनेची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 06:13 PM2020-09-23T18:13:25+5:302020-09-23T18:13:53+5:30

महासभेत महापौर, उपमहापौर यांना बहुमताचा सामना करावा लागणार असून, शहर विकास थांबण्याची भीती व्यक्त होत आहे. 

In Ulhasnagar, BJP-OMI team supporting corporator, Shiv Sena's dilemma | उल्हासनगरात भाजपा-ओमी टीम समर्थक नगरसेवक साथ साथ, शिवसेनेची कोंडी

उल्हासनगरात भाजपा-ओमी टीम समर्थक नगरसेवक साथ साथ, शिवसेनेची कोंडी

Next

सदानंद नाईक 
उल्हासनगर : महापालिका स्थायी व विशेष समिती निवडणुकीनिमित्त भाजप व ओमी कलानी टीम एकत्र आल्याचे संकेत भाजप नगरसेवकांनी दिल्याने सत्ताधारी शिवसेना गोटात खळबळ उडाली. येणाऱ्या प्रत्येक महासभेत महापौर, उपमहापौर यांना बहुमताचा सामना करावा लागणार असून, शहर विकास थांबण्याची भीती व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर महापालिका महापौर निवडणुकीत भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांनी भाजपाऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना महापौरपदी निवडून आणले. विधानसभा निवडणुकीत भाजपाने कलानी कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याचे वचन पाळले नाही. या निषेधार्थ शिवसेनेला मतदान केल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी त्यावेळी दिली होती. तेव्हापासून भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेना सोबत आहेत. दरम्यान स्थायी व विशेष समिती सदस्य निवडीसाठी २२ सप्टेंबर रोजी दुपारी विशेष महासभा बोलावली. महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात स्थायी व विशेष समिती मध्ये भाजपचे बहुमत राहून सर्व सभापतीपदे भाजपाकडे जाणार आहेत. तसेच ओमी टीम समर्थक नगरसेवकांना सदस्यपदी निवडून देणार नाही. अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याने ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांची कोंडी झाली. यातूनच महासभा अनिश्चित काळासाठी स्थगित केली, असे बोलले जात आहे.

 महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदासह विशेष समिती सभापती पदे स्वतःकडे ठेवून शिवसेनेची कोंडी करण्यासाठी, भाजपने ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकाला गोंजरणे सुरू केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. भाजप व ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक सोबत आल्याची माहिती काही भाजपचे नगरसेवक सांगत आहेत. मात्र ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक व पदाधिकारी याबाबत काही एक बोलण्यास तयार नाही. एकूणच भाजप व ओमी टीम सोबत आले का? याबाबत शहरात संभ्रम निर्माण झाला आहे. भविष्यात महापालिका निवडणुक भाजप व ओमी टीम सोबत लढविणार असल्याचे संकेत भाजपचे नगरसेवक देत असलेतरी, येणाऱ्या स्थायी व विशेष समिती सदस्य निवडीत ओमी टीम समर्थक नगरसेवकांना भाजप स्थान देणार का? असा प्रश्न निर्माण झाला. समिती सदस्य निवडीत स्थान दिल्यास प्रत्यक्ष सभापती निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला ओमी समर्थक नगरसेवक मतदान करणार का? असा प्रश्न स्थानिक भाजप नेत्यांना भेडसावत आहे. एकूणच भाजप - ओमी टीमचा समझोता होणार का? यावरच प्रश्नचिन्ह आहे. 

भाजपा व ओमी टीमला शुभेच्छा....शिवसेना
महापालिका महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई अशान तर उपमहापौरपदी भगवान भालेराव निवडून आले आहेत. स्थायी व विशेष समिती सभापती पदे भाजप - ओमी टीम कडे गेलेतर तेही अप्रत्यक्ष महापालिका सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे भाजप व ओमी टीमला आमच्याकडून शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

Web Title: In Ulhasnagar, BJP-OMI team supporting corporator, Shiv Sena's dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.