उल्हासनगर भाजपाची प्रचाराची धुरा उपऱ्यांकडे
By admin | Published: February 14, 2017 02:58 AM2017-02-14T02:58:46+5:302017-02-14T02:58:46+5:30
महापालिका निवडणुकीची धुरा शहराबाहेरील भाजपा पदाधिकारी व आमदारांनी घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार
सदानंद नाईक / उल्हासनगर
महापालिका निवडणुकीची धुरा शहराबाहेरील भाजपा पदाधिकारी व आमदारांनी घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष पूर्णिमा कबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी शहरात डेरेदाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे नियोजन होणार आहे. माजी आमदार व जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, नरेंद्र राजानी यांच्यासह वरिष्ठ नेते त्यांना मदत करणार आहेत.
उल्हासनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांतील पदाधिकाऱ्यांना विविध विभागांची जबाबदारी दिली आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली निवडणूक होणार असून आमदार नरेंद्र पवार, पूर्णिमा कबरे यांनी विविध प्रभागांत जाऊन प्रभागांतील उमेदवार व त्यांच्या प्रचाराचा आढावा घेतला.ओमी कलानी टीमचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार असून पश्चिमेत ३५, तर पूर्वेत १२ नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. सिंधीबहुल प्रभागात भाजपाची टक्कर साई पक्षासोबत, तर मराठी परिसरात शिवसेनेसोबत आहे.
१५ फेब्रुवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार असून रॅली व सभांचे आयोजन केल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. मराठी परिसरात आयलानी यांचा चेहरा चालणार नसल्याने आमदार नरेंद्र पवार व पूर्णिमा कबरे यांना पुढे केले. तर, पूर्वेत पक्षाचे मास्टरमाइंड राजा गेमनानी व नगरसेवक राजा वानखडे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. भाजपाच्या विद्यमान ११ पैकी २ नगरसेवक पूर्वेतून, तर ९ पश्चिम विभागांतून निवडून आले होते. ओमी टीम व भाजपाने पश्चिम विभागात विद्यमान ३४ तर पूर्वेत ५ नगरसेवकांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सत्तेसाठी ४० चा जादूई फिगर गाठण्यासाठी पक्षाने पश्चिमेतून, ३५ तर पूर्वेतून १२ नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.
चौक सभा व रॅलीवर भर ओमी कलानींमुळे मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी शहराकडे पाठ फिरवल्याने प्रचाराची धुरा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आली असून त्यांनी कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व इतर शहरातील पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी चौक सभा व रॅलीवर भर दिला असून १५ फेबु्रवारीपासून प्रचाराची धुरळा उडणार आहे. सिंधी परिसरात ओमी कलानी यांना सोबत ठेवणार असून इतर मराठी परिसरात आमदार नरेंद्र पवार इतर पदाधिकाऱ्यांना पुढे केले जाणार आहे.