उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेत स्ट्रेचर पडतात अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:01 AM2021-01-30T00:01:48+5:302021-01-30T00:01:57+5:30

नातेवाइकांनाच करावी लागते व्यवस्था : दरराेज ८०० हून जास्त बाह्यरुग्ण

Ulhasnagar Central Hospital has insufficient number of stretchers | उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेत स्ट्रेचर पडतात अपुरे

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेत स्ट्रेचर पडतात अपुरे

googlenewsNext

सदानंद नाईक

उल्हासनगर : जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, रुग्णसंख्येच्या तुलनेत स्ट्रेचरसह कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचा आरोप रुग्णांसह त्यांचे नातेवाईक करीत आहेत. वेळप्रसंगी स्ट्रेचर वाहून नेण्यासही त्यांना मदत करावी लागत आहे.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, ग्रामीण व आदिवासी परिसर, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, वांगणी आदी परिसरातून शेकडो गरीब व गरजू नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णांच्या संख्येत डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयसह इतर यंत्रणा अपुरी पडत असल्याने, रुग्णांवर उपचार करण्यास मर्यादा येत आहेत. 

स्ट्रेचरची संख्या पुरेशी; प्रशासनाचा दावा
मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची संख्या मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याने रुग्णांना वाहून नेण्यासाठी स्ट्रेचरची संख्या कमी आहे. मात्र, रुग्णालयात स्ट्रेचरची संख्या पुरेशी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. त्यांची एकूण संख्या सांगण्यास त्यांनी नकार दिला.

मध्यवर्ती रुग्णालयाचा एकेकाळी नावलौकिक असल्याने कल्याण व परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांतील वाद वेळोवेळी उफाळून येऊन त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. असे असले, तरी गरीब व गरजू रुग्णांवर उपचार होत असल्याने समाधान आहे. एकूणच शासनाने लक्ष देऊन रुग्णालयात सुधारणा केल्यास अनेकांना पुनर्जन्म मिळणार आहे.- नातेवाईक

शहापूरमधील दुर्गम भागातून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून आलो आहोत. पहिल्यादिवशी लांब रांगेत उभे राहून तपासल्यावर भरती केले. मात्र, रुग्णाला भरती करणे व प्रत्यक्ष उपचार सुरू करण्यासाठी कित्येक तास खर्ची झाले. रुग्णांना वरच्या मजल्यावर स्ट्रेचरवरून वाहून नेण्यासाठी वॉर्डबॉय व डॉक्टरांची मनधरणी करावी लागली. येथेही गरीब व गरजू रुग्णांना उपचार महाग झाले. - नातेवाईक

मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त व डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची संख्या त्याप्रमाणात अपुरी असल्याने रुग्ण सेवेवर ताण पडतो. मात्र, तरीही डॉक्टरांसह इतर कर्मचारी आपले कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत असल्याने आरोग्यसेवा देण्यास रुग्णालय यशस्वी झाले. रुग्णसंख्येच्या प्रमाणात स्ट्रेचरची संख्या कमी असली, तरी ती पुरेशी आहे. -डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, मध्यवर्ती रुग्णालय

 

Web Title: Ulhasnagar Central Hospital has insufficient number of stretchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.