उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना? अनेकांचा मृत्यू, मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:57 PM2020-07-06T17:57:54+5:302020-07-06T17:58:02+5:30
मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.
उल्हासनगर : जिल्हास्तरीय दर्जा असलेले मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला. तर रुग्णालयाने दोन पैकी एक व्हेंटिलेटर चांगले असून तंज्ञ डॉक्टर नसल्याने ते बंद असल्याचा खुलासा रुग्णालयाने केला आहे. तर गंभीर रुग्णांना ठाणे अथवा मुंबईला हलवित असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
उल्हासनगरातील आरोग्य यंत्रणेचा कसा बोजवारा उडाला हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याने रविवारी उघड झाला. दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन, शहरातील आरोग्य व्यवस्थेचा पाडा वाचला. शहरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयातील २४ पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन मध्ये गेल्याने वैद्यकीय सेवेवर ताण पडला आहे. रुग्णालयाकडे असलेल्या दोन व्हेंटिलेटर शहर पूर्वेतील कोविड रुग्णालयाला दिल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. असा आरोप मनसेने करून त्यामुळे अनेक रुग्णाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे.
मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. तसेच रुग्णालयाच्या आरोग्य सुविधा बाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे संचालक आदींना पाठविल्याची माहिती दिली. रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांनी रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात दोन व्हेंटिलेटर असून त्यापैकी एक चांगल्या स्थितीत आहे. मात्र तंज्ञ डॉक्टर नसल्याने दुसरे बंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच अपुरी सुखसुविधा व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी असताना जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णालय सेवा देत असल्याचे डॉ जाफर तडवी म्हणाले.
वाढत्या रुग्णाने महापालिका प्रशासन हतबल
शहरात गेल्या तीन दिवसात ६०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णात वाढ झाल्याने, त्यांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न पालिका प्रशासना समोर पडला आहे. धोकादायक इमारत घोषीत केलेल्या विमा कामगार रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु असून पावसाळ्यात रुग्णालय इमारतीला गळती लागत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.