उल्हासनगरात संततधार पाऊस, वालधुनी नदी वाहते दुथडी भरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:19+5:302021-07-22T04:25:19+5:30
उल्हासनगर : संततधार पावसाने मयूर हॉटेल, गोल मैदान, शांतीनगर स्मशानभूमी चौक, आदी सखल भागांत पाणी साचले होते. शहर पश्चिममध्ये ...
उल्हासनगर : संततधार पावसाने मयूर हॉटेल, गोल मैदान, शांतीनगर स्मशानभूमी चौक, आदी सखल भागांत पाणी साचले होते. शहर पश्चिममध्ये झाड पडल्याची, तर रमाबाई आंबेडकरनगरमध्ये साप निघाल्याची घटना घडली असून, वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे.
संततधार पावसामुळे बाजारपेठेच्या परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. गोल मैदान, शिरू चौक, मयूर हॉटेल, स्मशानभूमी चौक, कैलास कॉलनी, फर्निचर मार्केट परिसरांत पावसाचे पाणी साचले होते. शहर पश्चिममध्ये एक जुने झाड पडले असून आपत्कालीन विभागाने झाड हटविल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. संततधार पावसाने रस्ते खड्डेमय झाले. उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून, समतानगर येथील मुख्य रस्त्यावर असलेला नाल्यावरील पूल धोकादायक झाला आहे.
महापालिका आपत्कालीन विभागाने वालधुनी नदीकिनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोमवारी व मंगळवारी नदीच्या पुराचे पाणी भारतनगर, शांतीनगर येथील गहूबाई पाडा, सम्राट अशोकनगर, आदी परिसरांतील घरांत गेले होते. पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था महापालिकेने शाळा, समाजमंदिर परिसरांत केली होती. थारासिंग दरबार यांनी शेकडो नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.