उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला नागरिकांकडून चोप, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: December 4, 2024 02:56 PM2024-12-04T14:56:14+5:302024-12-04T14:57:01+5:30
Ulhasnagar Crime News: जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, रेल्वे स्टेशन परिसरात एक जीन्स पॅन्ट व कपडे अल्टरेशन दुकान आहे. या दुकानात एक तरुणी अल्टरेशनला दिलेला जीन्स पॅन्ट घ्यायला सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेली होती. यावेळी जीन्स ट्रायल करीत असताना टेलरने बघितल्याचा आरोप तरुणीने करून, बाजूलाच्या के.पी.कलेक्शन दुकानात धाव घेतली. तीच्या सोबत घडलेला सर्वप्रकार दुकानदार व नागरिकांना सांगितला. तरुणी सोबत झालेल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांनी टेलरला भर रस्त्यात मारहाण केली. यावेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे दोन बीट मार्शल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना समजावून टेलरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी पोलिसांचे काहीएक ऐकले नाही.
संतप्त नागरिकांकडून मारहाण झालेल्या टेलरला पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून, उपचार सुरु केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी टेलरवर विनयभंगाचा तर कायदा हातात घेऊन टेलरला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या ५ नागरिकांवर मारहानीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.