उल्हासनगरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के; मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 02:15 PM2020-08-09T14:15:36+5:302020-08-09T14:15:55+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के ...
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त आहे. तर मृत्यू दर सव्वा २ टक्के पेक्षा कमी आहे. कोरोना पोझीटीव्ह रुग्ण संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत असल्या तरी चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची टीका होत आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाच्या संख्या झपाट्याने कमी झाली असून लॉकडाऊन काळात वाढ झाली होती. त्याचा ताण आरोग्य सुविधेवर पडून राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू होऊन आरोग्य विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कारभारावर टीका झाली. मात्र आयुक्तांनी सर्वपक्षीय स्थानिक नेते, नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवित एक विशेष आराखडा तयार केला. अखेर आयुक्तांच्या पर्यंत्नाला यश येवून पाॅझिटीव्ह कोरोना रुग्णाला ब्रेक लागला. दरम्यान कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त झाले. तसेच मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी झाला आहे. आयुक्तांच्या कामाचे कौतुक शहरातून होत असताना, विशिष्ठ एका अधिकाऱ्यांना महत्त्व दिल्याची टिका सर्वस्तरातून होत आहे.
शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ७ हजार ११४ पेक्षा जास्त असून त्यापैकी ६ हजार ३७८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर आजपर्यंत १५४ जणाचा मृत्यू झाला. तसेच ५८२ रुग्णावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी फक्त ७० टक्के पेक्षा जास्त रुग्णांना ,सौंम्य व अतिसौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. तर ८७ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असून २७० रुग्णांवर महापालिका क्षैत्राबाहेरील रूग्णालयात उपचार सुरू आहे. एकूणच शहर कोरोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहे. असे बोलले जात आहे. नागरिकांनी काम असेलतर घरा बाहेर पडा. असे आवाहन महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी केले आहे. दरम्यान कोरोना चाचण्या कमी होत असल्याने, रुग्णाची संख्या कमी असल्याची टिका शहरातून होत आहे.
चौकट
शेजारील शहरापेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त
शेजारील ठाणे, कल्याण, मिरा - भाईंदर, अंबरनाथ आदी पालिके पेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात जास्त आहे. तसेच पोझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाल्याचे चित्र आहे. याबाबतची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.