उल्हासनगर : बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:39 AM2018-01-22T02:39:35+5:302018-01-22T02:39:46+5:30
बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार स्थायी समितीचे सभापती कंचन लुंड यांनी केला आहे. यासाठी २० बस खरेदी करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.
उल्हासनगर : बंद पडलेली महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्धार स्थायी समितीचे सभापती कंचन लुंड यांनी केला आहे. यासाठी २० बस खरेदी करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.
उल्हासनगर महापालिकेवर एक दशकापूर्वी शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आल्यानंतर खाजगी कंत्राटदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली. ही परिवहन सेवा सुरळीत सुरू असताना तिकीट दरावरून महापालिका व कंत्राटदारात जुंपली. तिकीट दर वाढवून देत नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटदाराने परिवहन सेवा बंद केली. त्यानंतर अनेकदा परिवहन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही. एकही बस रस्त्यावरून धावत नसताना परिवहन समितीवर लाखोंची उधळपट्टी करण्यात येत असल्याने सर्व स्तरातून टीका होत आहे.
परिवहन सेवा सुरू करण्याचा मानस लुंड यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी निर्णायक भूमिका घेत २० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सामान्य नागरिक, ज्येष्ठ व शालेय विद्यार्थ्यांना बसचा सर्वाधिक फायदा होणार असून लवकरच बस रस्त्यावर धावणार आहेत.
नगरसेवक शेरी लुंड यांनीही परिवहन सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सुचवले होते. अखेर परिवहन सेवा सुरू करण्यास महापालिकेने तयारी दाखवली असल्याचे लुंड यांनी सांगितले.
बस खरेदी करण्याची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर बसचा मार्ग व इतर माहिती देणार असल्याचे शेरी लुंड म्हणाले.