उल्हासनगर डॉल्फिन रस्ता खड्ड्यातून, व्हायरल व्हिडिओची चर्चा, महापालिकेचे पितळ उघडे
By सदानंद नाईक | Published: August 9, 2023 04:18 PM2023-08-09T16:18:18+5:302023-08-09T16:19:40+5:30
रस्त्यातून जातांना वाहनचालक हैराण झाले असून नागरिक अपघाताच्या भीतीने रस्त्यावरून जाण्यास टाळत असल्याचे बोलले जाते.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील डॉल्फिन रस्ता दुरुस्तीवर ४ महिन्यांपूर्वी लाखोंचा खर्च करूनही रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्ता संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, खळबळ उडून महापालिका कामकाजाचे लक्तरे टांगल्या गेली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता पुनर्बांधणीला एमएमआरडीएने गेल्या एका वर्षांपासून मंजुरी दिली. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला अद्याप सुरवात झाली नाही. गेल्याच आठवड्यात आयुक्त अजीज शेख यांनी एमएमआरडीएने मंजूर केलेल्या १५६ कोटीच्या निधीतील एकून ७ रस्त्याचा आढावा घेऊन रस्ते मुदतीत पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली होती. गेल्या ४ महिन्यांपूर्वी शहरातील विकास कामाचे लोकार्पण व विकास कामाचे उदघाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवाजम्यासह याच रस्त्यावरून संच्युरी कंपनीच्या मैदानावर येणार असल्याने, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीवर स्थानिक नागरिकांसह विविध पक्षांनी प्रश्नचिन्हे उभे केले. तेंव्हा रस्त्याची पुनर्बांधणी एमएमआरडीए कडून होणार असल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते.
शहरातील डॉल्फिन रस्त्याची दुरुस्तीला चार महिन्याचा कालावधी उलटला नसतांनाही, पावसाळ्यात रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहे. रस्त्यातून जातांना वाहनचालक हैराण झाले असून नागरिक अपघाताच्या भीतीने रस्त्यावरून जाण्यास टाळत असल्याचे बोलले जाते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी रस्त्याला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शिव्यांची लाखोली वाहिली आहे. या व्हिडीओची शहरात जोरदार चर्चा होत असून महापालिका बांधकाम विभागाच्या कामकाजासाचें लक्तरे टांगली आहे. महापालिका बांधकाम विभागासह अन्य विभागातील सावळागोंधळावरही अशीच टीका होत असून संबंधित विभागाची चौकशी झाल्यास अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.