उल्हासनगर पोटनिवडणूक : सेनेच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:55 AM2018-04-02T06:55:01+5:302018-04-02T06:55:01+5:30
महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना, रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, भारिप यांनी पाठिंबा दिल़्याने कधी नव्हे एवढी ही लढत रंगतदार बनली आहे. ओमी टीमने या निवडणुकीत आपली उमेदवार उभा केला असून राष्ट्रवादीच्या ताब्यातील जागा खेचून घेण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत.
उल्हासनगर - महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना, रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, भारिप यांनी पाठिंबा दिल़्याने कधी नव्हे एवढी ही लढत रंगतदार बनली आहे. ओमी टीमने या निवडणुकीत आपली उमेदवार उभा केला असून राष्ट्रवादीच्या ताब्यातील जागा खेचून घेण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपा नेत्यांनीही त्यांना पाठबळ दिल्याचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या निवडणुकीतील निकालाशी ओमी टीमला मिळणाऱ्या महापौरपदाची सांगड घातली गेल्याने ओमी टीमचे अस्तित्त्वच पणाला लागले आहे.
ओमी कलानी यांच्यासह त्यांच्या टीमच्या सदस्यांनी प्रभागात ठाण मांडले आहे. पण शिवसैनिकांनी मात्र भाजपाला कडवा विरोध करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे.
प्रभाग १७ मध्ये होणारी ही पोटनिवडणूक ६ एप्रिलला पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या पूजा कौर-लबाना यांचे नगरसेवकपद रद्द झाले असून राष्ट्रवादी आणि भाजपाने ती प्रतिष्ठेची केली आहे. ओमी टीमने ही जागा लढवण्याचे ठरवले असले तरी भाजपाच्या चिन्हावर होत असल्याने त्या पक्षाचे नेतेही प्रचारात उतरले आहेत. भाजपाच्या एका गटाचे ओमी टीमशी पटत नसले तरी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोणत्याही परिस्थितीत विजयासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिल्याने पक्षाच्या नाराज, असंतुष्ट नेत्यांनाही त्यात उतरावे लागले आहे.
भाजपा-ओमी टीमच्या साक्षी पमनानी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव आणि काँग्रेसच्या जया साधवानी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मताची विभागणी होऊ नये म्हणून शिवसेना,
रिपाइंने उमेदवार रिंगणात उतरविलेले नाहीत. महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी व भारिप हे पक्ष विरोधी पक्षात आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह इतर विरोधी पक्षांनी राष्ट्रवादीच्या सचदेव यांना पाठिंबा दिला आहे.
भाजपाला करिष्मा दाखवण्याची टीम ओमीला संधी
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने पक्षाच्या माजी नगरसेविका शकुंतला जग्यासी यांची उमेदवारी मागे घेतली आणि पक्षाने ओमी टीमच्या साक्षी पमनानी यांना रिंगणात उतरवले. एप्रिलच्या पहिल्या आठवडयात स्थायी समितीच्या सभापतींची निवड होईल. हे पद यावेळी ओमी टीमला देण्याचे ठरले होते. त्याऐवजी भाजपाच्या जया माखिजा यांना ते दिले जाणार आहे, तर महापौरपद तीन महिन्यांनतर ओमी टीमला देण्याचे ठरले. पोटनिवडणुकीत पमनानी यांचा पराभव झाल्यास ओमी टीमचा करिष्मा ओसरला, असे कारण दाखवत त्यांच्या महापौरपदासह अन्य पदांवर गंडांतर येऊ शकते.