उल्हासनगर पोटनिवडणुकीच्या निकालाने संपवली ओमी टीमची सद्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:17 AM2018-04-23T03:17:32+5:302018-04-23T03:17:32+5:30
काहीही झाले तरी भाजपातील एक गट ओमी कलानी यांना नामोहरम केल्यावाचून स्वस्थ बसणार नाही हे या पराभवाने भाजपा नेत्यांच्या लक्षात आले.
सदानंद नाईक, उल्हासनगर|
पालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणूक. पण, ती जिंकण्यासाठी भाजपा-ओमी टीमने सर्वस्व पणाला लावले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला खेचून आणण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेली राजकीय खेळी फसली आणि सुरू झाली ओमी कलानी यांच्या राजकारणाची उतरती कळा. काहीही झाले तरी भाजपातील एक गट ओमी कलानी यांना नामोहरम केल्यावाचून स्वस्थ बसणार नाही हे या पराभवाने भाजपा नेत्यांच्या लक्षात आले. ओमी टीमलाही कुठे थांबावे हे कळले नाही. त्यामुळे यापुढे भाजपासोबत सुखाने संसार करू, असे सांगण्याचा आटापिटा त्यांना करावा लागतो आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये पोटनिवडणूक झाली. हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. राष्ट्रवादीनेही बालेकिल्ला टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यांना यश आले. भाजपाने ओमी टीमशी युती करत उमेदवार उभा केला. तर, राष्ट्रवादीला शिवसेनेसह अन्य पक्षांनी पाठिंबा दिला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ओमी कलानी यांनी प्रभागात ठिय्या मांडूनही पदरी पराभव आला.
यामुळे भाजपा, ओमी टीम तोंडघशी पडले. पराभवामुळे भाजपामधील ओमी टीमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले. तसेच मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असलेले राज्यमंत्री रिंगणात असले, तरी भाजपाचा एक गट ओमी टीमसोबत नांदण्यास तयार नाही. पक्षाच्या चिन्हावर निवडून आला असला, तरी ओमी टीमचा पराभव हे जणू त्यांचे ध्येय बनल्याचे यातून दिसून आले.
उल्हासनगर एकेकाळी जनसंघ व भाजपाचा बालेकिल्ला होता. १९८५ दरम्यान पप्पू कलानी यांचा उदय होऊन सुरुवातीला नगरसेवक, नगराध्यक्ष व १९९० मध्ये विधानसभा निवडणूक लढवून कलानी काँॅगे्रस पक्षाच्या चिन्हावर आमदार झाले. मात्र, त्यांच्यावर टाडासह विविध गुन्हे दाखल होऊन त्यांना नऊ वर्षांची शिक्षा झाली. काँॅग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यावरही सलग दोन वेळा ते जेलमधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तर, चौथ्यावेळी रिपाइं आठवले पक्षाच्या चिन्हावर आमदार झाले. कलानी कुटुंबाने दोन दशके शहरावर राज्य केले. मध्यंतरी, कलानी यांचे कट्टर समर्थक त्यांना सोडून गेल्याने त्यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कुमार आयलानी यांनी पराभव केला. मात्र, पुन्हा पाच वर्षांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर ज्योती कलानी आमदार म्हणून निवडून आल्या. असे असले तरी महापालिकेच्या सत्तेपासून कलानी कुटुंबाला सलग १० वर्ष बाजूला राहावे लागले.
पप्पू कलानी यांना बठिजा बंधूंच्या हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर ‘कलानीराज संपले,’ अशी आवई उठवण्यात आली. मात्र, कलानी यांनी जुन्या काही सहकाऱ्यांना एकत्र करत मुलगा ओमी याच्या पाठीशी उभे केले. ओमी यांनी टीम उभी केली. स्वत:च्या बळावर पालिकेत सत्ता येणार नाही, हे ओळखून ओमीने भाजपाची टाळी स्वीकारली. त्यातून भाजपाच्या बाहुंत दहा हत्तींचे बळ संचारले. भाजपासोबत यापुढे कुठेही युती नाही, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून टाकल्याने भाजपाला सत्तेसाठी नव्या मित्रांची गरज होती. तीही पूर्ण झाली. निकालानंतर भाजपा व ओमी टीम स्वबळावर सत्ता आणण्यात कमी पडल्यावर त्यांनी साई पक्षाला सोबत घेतले. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी हे पप्पू कलानी यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जात होते. त्यांनी कलानी यांच्यापासून फारकत घेत साई पक्षाची स्थापना केली. तसेच आपल्या छोट्या का होईना, राजकीय ताकदीचा वापर करत कलानी कुटुंबाला पालिका सत्तेपासून १० वर्षे लांब ठेवले.
मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आली. मात्र, भाजपातील असंतुष्ट आणि साई पक्षाने एकत्र येत ओमी टीमची कोंडी सुरू केली. त्यांना महत्त्वाच्या पदांपासून वंचित ठेवल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. सव्वा वर्षाने महापौरपद देण्याचे आमिष कलानी कुटुंबाला दाखवण्यात आले. साई पक्षाला उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापती, प्रभाग व विशेष समितीची सभापतीपदेही देण्यात आली. दुसºया वर्षीच्या प्रभाग समिती सभापतीपदापासूनही त्यांना वंचित ठेवले. दुसरीकडे साई पक्षाला दोन प्रभाग सभापतीपदे देण्यात आली. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपाने ओमी टीमला एक संधी दिल्यासारखे भासवले. पोटनिवडणुकीत भाजपाने स्वत:च्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत ओमी टीमच्या साक्षी पमनानी यांना रिंगणात उतरवले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पोटनिवडणुकीत हजेरी लावून भाजपा पदाधिकाºयांसह नगरसेवकांना कामाला जुंपले. प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत ओमी कलानी १० ते १५ दिवस सहकाºयांसह प्रभागात ठाण मांडून बसले होते. पर्वीपासून कलानीसमर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांना त्यांनी आपल्याकडे वळवून राष्ट्रवादी गोटातील हवा काढून घेतली. निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. शहर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा भरत गंगोत्री यांनी ओमी यांच्याशी दोन हात करण्याची तयारी केल्याने, पोटनिवडणूक कधी नव्हे ती प्रतिष्ठेची झाली. भाजपा व ओमी टीमला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, रिपाइं, पीआरपी आदी पक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत निवडणुकीत रंगत आणली. त्यामुळे वरवर जरी भाजपाचा परभाव झाला असला, तरी पक्षातील ओमी टीमची सद्दी संपवण्यासाठी काही नेते कोणत्या थराला जाऊ शकतात याची चुणून इतरांना मिळाली आणि ओमी टीमशिवाय भाजपाने राजकारण करावे. त्यासाठी प्रसंगी शिवसेनेला सोबत घ्यावे, अशा हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे हा केवळ भाजपा-ओमी टीममधील संघर्ष नाही, तर आयलानी-कलानी असा संघर्ष आहे.
असंतुष्टामुळे झालेला पराभव राज्यमंत्र्यांच्या जिव्हारी
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले होते. निवडणुकीच्या अखेरच्या दोन दिवसांत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सर्व हातखंडे वापरल्यावरही भाजपा-ओमी टीमच्या साक्षी पमनानी यांचा पराभव राज्यमंत्री यांच्या जिव्हारी लागला आहे. पण भाजपाचाच एक असंतुष्ट गट आपल्या उमेदवाराविरूद्ध काम करत असल्याचे स्पष्ट होऊनही ते फार काही करू शकले नाहीत.
कलानी कुटुंबाला विरोध हेच ध्येय भाजपातील आयलानी गट नेहमीच कलानी कुटुंबाच्या विरोधात राहिला आहे. त्यांनी प्रत्येकवेळी ओमी टीमची कोंडी करण्याचा प्रयत्न केली. त्यामध्ये ते यशस्वी झाले. कलानी कुटुंबाला महापौरपदासह आमदारकी मिळू नये, म्हणून आयलानी गट सक्रिय आहे. तसेच दुसरा गटही ओमी कलानी वरचढ होऊ नये, म्हणून शांत आहे. एकूण ओमी टीमच्या महापौरपदासह आमदारकीच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून त्यासाठी भाजपातील सर्व गटतट एकत्र येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. भाजपातील हा संघर्ष निकराचा बनला आहे.