उल्हासनगरात नावालाच प्लास्टिक पिशवीबंद, प्लास्टिक पिशवी बनविणाऱ्या कारखान्यांना अभय; काँग्रेसचा आरोप
By सदानंद नाईक | Published: September 8, 2023 02:44 PM2023-09-08T14:44:01+5:302023-09-08T14:45:08+5:30
उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात प्लास्टिक पिशव्याचा वापर करणारे दुकानदार व फेरीवाल्यावर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरात खुलेआम प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्याची विक्री सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके यांनी करून आयुक्तांना लेखी निवेदन दिले. निवेदनात महादेव कंपाऊंड, गजानन कंपाऊंड, मुरलीधर कंपाऊंड व कॅम्प नं-५ परिसरात प्लास्टिक पिशवी बनविणाऱ्या कारखान्याना अभय कोणाचे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात प्लास्टिक पिशव्याचा वापर करणारे दुकानदार व फेरीवाल्यावर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरात प्लास्टिक पिशवीची सर्रासपणे विक्री होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके यांनी केला आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीमुळे पाणी व वायू प्रदूषण होत असून पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे नाल्या तुंबून पुराचे पाणी अनेकांच्या घरात गेल्याचा आरोप धडके यांनी केला. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून कारखाने शहरातून हद्दपार करण्याची मागणी धडके यांनी केली आहे.
शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असलेले किशोर धडके यांनी शहर पश्चिम मधील महादेव कंपाऊंड, गजानन कंपाऊंड, मुरलीधर कंपाऊंडसह कॅम्प नं-५ परिसरात प्लास्टिक पिशव्या बनविणारे कारखाने व मुख्य मार्केट मध्ये प्लास्टिक पिशवी विक्रेते असल्याचा आरोप केला आहे. महापालिका अश्या कारखान्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न निवेदनात धडके यांनी महापालिका आयुक्तांना विचारला आहे. प्लास्टिक पिशवी प्रकरणी एका राजकीय पक्षाचा व्यापारी नेता महत्वाची भूमिका वठवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोठे माशे सोडून महापालिका हातावर पोट असलेल्या लहान व्यापारी व फेरीववाल्यावर कारवाईचा बडगा उगारत असल्याचे धडके यांचे म्हणणे आहे.