उल्हासनगर गोळीबार: जखमी महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:51 AM2024-02-05T10:51:29+5:302024-02-05T10:52:21+5:30
हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजपा आमदाराने केलेल्या गोळीबारात झाले होते जखमी
Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad, Shrikant Shinde: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज महेश गायकवाड यांची रुग्णलयात जाऊन चौकशी केली. गोळीबाराची घटना घडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही श्रीकांत शिंदे तब्येतीची विचारपूस करायला उपस्थित होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी ज्युपिटर रूग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे यांच्यासह संदीप सरवनकर यांना अटक करून त्यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. तसेच गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींच्या तपासासाठी ६ पथके तैनात केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे. जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांची साक्ष घेतली नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली. या घटनेचे पडसाद राज्यासह देशात उमटले असून आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर, वैभव गायकवाड, नागेश बेडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह अन्य जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.