उल्हासनगर कचरा कुंड्या मुक्तचा नाऱ्याची आमदारांकडून पोलखोल
By सदानंद नाईक | Published: April 19, 2023 06:15 PM2023-04-19T18:15:34+5:302023-04-19T18:16:03+5:30
शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला.
उल्हासनगर : शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला. तसेच बैरेक व झोपडपट्टीतील कचरा उचलला जात नसल्याने, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे आयलानी म्हणाले.
उल्हासनगरात महापालिकेच्यां वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला होता. कचरा उचलण्यासाठी गाड्या फिरत आहेत. मात्र बैरेक व झोपडपट्टीच्या गल्लीत या कचरा गाड्या जात नसल्याने, नागरीक कचरा रस्त्यावर अथवा कचरा कुंड्यात टाकत आहेत. त्यामुळे आयुक्तांचा कचरा कुंड्या मुक्त शहराचा नारा फक्त नारा राहिला असून कुंड्या कचऱ्याने ओव्हरफ्लॉ झाल्याचा आरोप आमदार आयलानी यांनी केला. बैरेक व झोपडपट्टीतील अरुंद रस्त्यावरून बाईक कचरा गाड्या गेल्या कुठे? असा प्रश्न आमदार आयलानी यांच्यासह भाजपचे जमनुदास पुरस्वानी यांनी केला.
शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नवीन १६० गाड्यासह मोठ्या गाड्या महापालिकेने खरेदी केल्या आहेत. तसेच कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला ठेकेदाराला देऊनही कचरा उचलला जात नसल्याबाबत आमदार आयलानी यांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनिद केणी, एकनाथ पवार यांनी याकडे लक्ष द्यावे. जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशाचा अपव्यय टाळावा. असा सल्लाही आमदार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष पुरस्वानी यांनी महापालिकेला दिला.
१ मार्च महिन्या पासून प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाई करण्याचे खाजगीकरण केल्याने, महापालिकेवर १० कोटीचा भुर्दंड पडल्याचा आरोप शहरातून होत आहे. एकूणच कचऱ्याच्या ठेक्या बाबत चुपकी साधणारे आमदार आक्रमक झाल्याने, पुढे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.