उल्हासनगरच्या महासभेत पाण्यावरून गोंधळ, आयुक्त विरूद्ध नगरसेवक : एकाधिकारशाहीचा आरोप; दिवाळीतही टँकरद्वारे पाणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:13 AM2017-10-10T02:13:29+5:302017-10-10T02:13:39+5:30
३०० कोटीची पाणी वितरण योजना राबवूनही उल्हासनगरात दिवाळीच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई आहे. सणासुदीच्या दिवसातही बहुतांश भागात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होत असलेल्या
उल्हासनगर : ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबवूनही उल्हासनगरात दिवाळीच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई आहे. सणासुदीच्या दिवसातही बहुतांश भागात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होत असलेल्या अपुºया पाणीपुरवठ्यामुळे महिला संताप व्यक्त करत असल्याने सोमवारी पार पडलेल्या महासभेत नगरसेवकांनी हा प्रश्न उचलून धरला. नळाद्बारे पाणी पुरवण्यात पालिका सक्षम नसेल, तर दिवाळीच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करा, असा प्रस्ताव नगरसेवकांनी मांडला. पण आयुक्तांनी टँकर सुरू करण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रचंड गोंधळ झाला.
त्यातच अंबरनाथ ते कल्याण रस्ताबाधितांना बांधकामाच्या परवानगीवरून आणि भरतीवरूनही आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा सामना रंगला. आयुक्त राजेंद्र निंबाळकर नवीन नगरसेवकांना मानसन्मान न देता एकाधिकारशाहीने वागत असल्याचा आरोप करून नगरसेवक मनोज लासी यांनी आयुक्तांचा निषेध केला.
महासभा सुरू होताच बहुंताश नगरसेवकांनी पाणीप्रश्नी आयुक्तांना धारेवर धरले. दीड ते दोन तास पाण्यावर चर्चा झाली. त्यानंतर लासी यांनी आयुक्तांवर नगरसेवकांना कमी लेखत असल्याचा आरोप
केला.
आयुक्तांची एकाधिकारशाही व मनमानी कोणताही नगरसेवक खमवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यावर त्यांच्यात आणि आयुक्तांत खडाजंगी झाली. आयुक्तांच्या वर्तनाविरोधात शासनाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि मनमानी कारभाराची उदाहरणे दिली.
शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, अरूण अशान, सुनील सुर्वे, रमेश चव्हाण, साई पक्षाचे टोणी सिरवानी, गजानन शेळके, रिपाइंचे भगवान भालेराव, पीआरपीचे प्रमोद टाले, सभागृह नेता जमनू पुरस्वानी, प्रदीप रामचंदानी, शुभांगी निकम आदींनी आयुक्तांच्या मनमानी कारभारावर टीका केली.