उल्हासनगरातील सत्तांतराला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:57 AM2018-05-07T06:57:52+5:302018-05-07T06:57:52+5:30

विधानसभा निवडणुकीतील सिंधी मतांच्या गणिताचा विचार करून महापौरपद आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावरील दावा सोडल्याने उल्हासनगरमधील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.

 Ulhasnagar government has come to power | उल्हासनगरातील सत्तांतराला आला वेग

उल्हासनगरातील सत्तांतराला आला वेग

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीतील सिंधी मतांच्या गणिताचा विचार करून महापौरपद आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावरील दावा सोडल्याने उल्हासनगरमधील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष समित्यांत शिवसेनेला वाटा दिला जाईल आणि जुलैत त्या पक्षाला उपमहापौरपद दिले जाईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहे. अन्य पदांच्या वाटपाबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा सुरू असल्याने स्थानिक पदाधिकारी फारसे बोलण्यास उत्सुक नाहीत.
या घडामोडींमुळे कलानी कुटुंबाचा नवा राजकीय प्रवास सुरू होईल, तर दशकभर किंगमेकर म्हणून आर्थिक नाड्या हाती ठेवणाºया साई पक्षाचे महत्त्व संपुष्टात येईल, अशी चर्चा भाजपा-शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
शिवसेनेने युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने उल्हासनगर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपाने ओमी टीमचा वापर करून घेतला. या टीमच्या बहुतांश उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या ३३ पैकी २२ नगरसेवक ओमी टीमचे असल्याचा दावा कलानी कुटूंबाकडून होत असला, तरी नव्या राजकीय घडामोडींत हे २२ नगरसेवक भाजपातून फुटून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. भाजपासोबत सत्तेत असल्याचे राजकीय फायदे त्यांना सोडायचे नाहीत. त्यामुळे भाजपात पुढील काळात आयलानी समर्थक आणि कलानी समर्थक असे दोन्ही गट अस्तित्त्वात राहतील. त्यातही कलानी समर्थकांना जर सत्तेचे लाभ मिळाले, तर त्यांचा राजकीय विरोध मावळत जाईल. सध्या त्याचीच भीीत ओमी कलानी यांना आहे.
उल्हासनगरच्या सत्तेत शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर भाजपाने कल्याण-डोंबिवली महापौरपदावरील दावा सोडावा, ही शिवसेनेची प्रमुख अट होती. ती भाजपाने मान्य केल्याने पुढील आठवड्यात होणाºया विशेष समितीच्या सदस्य आणि सभापतीपदाच्या निवडीत शिवसेनेला स्थान देत भाजपा-शिवसेनेची युती करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
जुलै महिन्यात महापौर मीना आयलानी यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपणार होता. ते पद पंचम ओमी कलानी यांच्याकडे जाणार होते. मात्र आयलानी या पदावर कायम राहतील. कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात भाजपाने हे पद पदरात पाडून घेतले आहे. साई पक्षाचे जीवन इदनानी यांचा सव्वा वर्षाचा कालावधी मात्र संपेल आणि त्यांना हे पद सोडावे लागेल. त्यानंतर हे पद शिवसेनेला दिले जाईल. या पदापासून शिवसेनेचा सत्तेतील सहभाग औपचारिकपणे सुरू होईल, असे दिसते.

पप्पू कलानी पुन्हा येरवडा कारागृहात

गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपा आणि ओमी टीमच्या महाआघाडीचे चित्र स्पष्ट होताच भाजपाच्या एका मंत्र्याच्या मध्यस्थीने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानी यांना येरवडा कारागृहातून तळोजा जेलमध्ये आणले होते. पण महापौरपदावरून ओमी टीम अणि भाजपात दरी निर्माण होताच गेल्या आठवड्यात पप्पू कलानी यांना पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यात आले. या प्रकाराने कलानी कुटुंबाला धक्का बसला आहे. त्यामुळे कलानी कुटुंब भाजपापासून दूरावल्यावर शिक्कामोर्तब झाले.

भाजपातील गटतट अचानक संपुष्टात

कलानी यांच्या पक्षप्रवेशावरून दोन गटांत विभागली गेलेली शहर भाजपा सध्या अचानकपणे एक झाली आहे. ओमी टीममुले सत्ता मिळेपर्यंत पक्षात दोन स्वतंत्र गट कार्यरत होते. पण शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय झाला आणि ओमी टीम, साई पक्षाचे महत्त्व संपल्याचे लक्षात येताच सर्व जण एकत्र आले आहेत. कल्याणमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपाने महापौरपदावरील दावा मागे घेतल्यानंतर शहर भाजपात आनंदीआनंद आहे.

Web Title:  Ulhasnagar government has come to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.