थरारक VIDEO! गोविंदांऐवजी नशेखोर तरुणानं डोक्यानं फोडली ८० फूट उंचावरील दहीहंडी, पोलिसांनी केली अटक
By सदानंद नाईक | Published: August 20, 2022 07:00 PM2022-08-20T19:00:48+5:302022-08-20T19:02:10+5:30
या घटनेनंतर, एकच खळबळ उडाली. भोला वाघमारे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. हिललाईन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
उल्हासनगर : नेताजी चौकातील जय भवानी मित्र मंडळाची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी रात्री १० वाजताच्या सुमारास गोविंदा पथकाची सलामी सुरू होती. यातच नागरिकांची आतुरताही शिगेला पोहोचली होती. याच वेळी दहीहंडीचा दोरखंड बांधलेल्या ठिकाणाहून एक नशेखोर लटकत आला आणि त्याने डोक्यानेच ८० फूट उंचावरील दहीहंडी फोडली. या घटनेनंतर, एकच खळबळ उडाली. भोला वाघमारे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. हिललाईन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
उल्हासनगरात सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या संबंधित दहीहंड्या बघण्यासाठी नागरिक गर्दी करतात. कॅम्प नं-५ येथील नेताजी चौकातील जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी असेच आकर्षणाचे केंद्र झाले होते. सकाळपासून दहीहंडी ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी फोडण्यासाठी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ येथील गोविंदा पथकांनी सलामी दिली. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान दहीहंडी फोडण्याची आशा शिगेला पोहचली होती. कोणचे गोविंदा पथक बाजी मारणार? असे वाटत असतानाच दहीहंडीचा दोरखंड ज्या ठिकाणाहून बांधला होता. त्या ठिकाणाहून भोला वाघमारे नावाचा तरुण दोरखंडाला पकडून ८० फूट उंच दहीहंडीच्या दिशेने येताना नागरिकांना दिसला.
उल्हासनगरात गोविंदाऐवजी नशेखोराने फोडली दहीहंडी, हिललाईन पोलिसांनी केली अटक
— Lokmat (@lokmat) August 20, 2022
Video - सदानंद नाईक#dahihandi2022#Ulhasnagarpic.twitter.com/se2k9Cq859
नेताजी चौकात दहीहंडी निमित्त प्रचंड पोलीस बंदोबस्त तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ असतांना, त्यांची नजर चुकवून भोला दहीहंडी बांधली त्या दोरखंडावर चढलाच कसा? असा प्रश्न उपस्थित नागरिक व गोविंदा पथक यांना पडला आहे. दहीहंडीच्या दोरखंडावर लटकून आलेल्या नशेखोर तरुणाने, डोक्याने दहीहंडी फोडली. त्यावेळी नागरिकांनी एकच जल्लोष व आवाज झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून तरुणाला अटक करून हिललाईन पोलीस ठाण्यात आणले. हा तरुण फुटपाथवर राहून बिगारी काम करतो. अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत ढेरे यांनी दिली. या प्रकाराने दहीहंडीची चर्चा शहरभर रंगली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.