उल्हासनगरात रंगणार शिवसेना विरुद्ध आव्हाड सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:47 PM2021-07-03T18:47:57+5:302021-07-03T18:49:24+5:30
राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नाही, शहरातील प्रश्न निकाली निघणार : शिवसेना शहरप्रमुख चौधरी
सदानंद नाईक
उल्हासनगर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य शिवसेनेने खोडीत काढून राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नसून शासनाने गेल्या सहा महिन्यात शहर विकासासाठी १२५ कोटींचा निधी दिला, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून हजारो नागरिक विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त होते. दरम्यान उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती व धोकादायक इमारती मधील नागरिकांनी शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी बोलाविले होते. यावेळी आव्हाड यांनी ईगल येथील पत्रकार परिषदेत १५ दिवसात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची चर्चा व बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य शासनाची तिजोरी रिकामी असल्याचे सांगून कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जाते, असे बोलताना सांगितले.
याप्रकारने शिवसेनेत हलचल निर्माण झाली. राज्य सरकारमध्ये महत्वाचे मंत्रिपद असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी शासनाची तिजोरीत खळखळाट असल्याचे केलेले व्यक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान आदींनी प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल मध्ये शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. सहा महिन्यांपूर्वी शहर विकासासाठी राज्य शासनाने ७५ कोटींचा निधी दिला असून धोकादायक इमारती मधून बेघर होणाऱ्या नागरिकां साठी निवारा केंद्र व इतर सुविधेसाठी ५० कोटींचा निधी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता भरत गंगोत्री यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभागातील विकास कामांसाठी २६ कोटींचा निधी दिला. शासनाची तिजोरीत खळखळाट असतीतर शासनाने विकास कामासाठी कोट्यवधींची दिला असता का? असा प्रश्न शिवसेनेने केला. एकूणच शहरातील समस्या सोडविण्यासाठी श्रेयवाद निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून आव्हाड विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होते.