उल्हासनगर खेमानीचा रस्ता एका वर्षात उखडला; महापालिका बांधकाम विभागाची ठेकेदाराला नोटीस
By सदानंद नाईक | Published: December 20, 2023 06:05 PM2023-12-20T18:05:32+5:302023-12-20T18:05:49+5:30
कॅम्प नं-२, खेमानी परिसरातील बांधलेला रस्ता एका वर्षात उखडल्याने, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे झाली होती.
उल्हासनगर : कॅम्प नं-२, खेमानी परिसरातील बांधलेला रस्ता एका वर्षात उखडल्याने, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे झाली होती. अखेर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी ठेकेदाराला नोटीस काढून कारवाईचे संकेत दिले आहे. उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले बहुतांश सिमेंट काँक्रिटचे रस्ते दोन ते तीन वर्षात उखडत असल्याचे चित्र शहरात आहे. अशा निकृष्ट रस्ते बांधणाऱ्या ठेकेदार काळ्या यादीत न टाकता, त्यांचं कोट्यवधी किंमतीचे ठेके देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. कॅम्प नं-२ खेमानी चौक ते सुहानी सत्संग दरम्यानचा रस्ता गेल्या वर्षी सिमेंट काँक्रिटने बांधण्यात आला होता. मात्र एका वर्षात रस्त्याला भेगा पडल्या असून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सामाजिक संघटनेने आयुक्तांना पत्र पाठवून अश्या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. पालिका बांधकाम विभागाला याबाबत तक्रार मिळाल्यावर विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवून कारवाई करण्याचे संकेत दिले.
शहरातील कॅम्प नं-२ खेमानी रस्त्या प्रमाणे सी ब्लॉक येथील गुरुद्वार ते कलानी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची एका स्थानिक माजी नगरसेवकांने तक्रार केली. मात्र नोटिसा पलीकडे बांधकाम विभागाने अद्याप कारवाई केली नाही. कॅम्प नं-४ येथील हॉली फॅमिली शाळा व सार्वजनिक हॉल कडे जाणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत. मात्र नोटीस व्यतिरिक काहीएक कारवाई झाली नाही. याच परिसरातील हिंदू स्मशानभूमी शेजारी सिमेंट काँक्रीट रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम गेल्या ४ महिन्यापासून पूर्ण झाले. त्याच रस्त्याला हिंदू स्मशानभूमी समोर रस्ता निकृष्ट बांधल्याचा आरोप होत आहे. त्या रस्त्याची पाहणी करण्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे.
२५ वर्षापूर्वीचे रस्ते मजबूत
माजी आमदार पप्पु कलानी यांच्या कालावधीत बांधण्यात आलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते २५ वर्षानंतरही मजबूत आहेत. तर दुसरीकडे १ ते २ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले सिमेंट काँक्रीट रस्ते उखडत असल्याचे चित्र शहरात आहे. अश्या ठेकदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.