उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 02:58 AM2019-09-28T02:58:36+5:302019-09-28T02:58:48+5:30
कलानी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने राष्ट्रवादीत खळबळ
उल्हासनगर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या दिग्गजांमध्ये शुक्रवारी उल्हासनगरच्या आ. ज्योती कलानी यांची भर पडली. कलानी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विधानसभेसाठी पक्षाची उमेदवारी नाकारली होती.
उल्हासनगर विधानसभेच्या उमेदवारीची पक्षाची आॅफर ज्योती कलानी यांनी धुडकावून लावल्यावर पक्षाने गटनेते भरत गंगोत्री यांना कामाला लागण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आ. ज्योती कलानी यांच्याशी संपर्क साधून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. मात्र, शुक्रवारपर्यंत त्यांचा राजीनामा आला नव्हता. त्यामुळे नवीन शहर कार्यकारिणीला पक्षाने हिरवा कंदील दिला. त्यानंतर, ज्योती कलानी यांनी शुक्रवारी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवून दिला. एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पक्ष निरीक्षक सुधाकर बढे यांनी पत्रकार परिषद घेऊन ३८ जणांची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करून, शहराध्यक्षपदी हरकिरणकौर धामी यांची, तर सतीश चहाळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले. आ. ज्योती कलानी यांच्यामुळे पक्षाला नुकसान होणार नसून, आता उल्हासनगरात पक्ष कलानीमुक्त झाल्याची प्रतिक्रिया भरत गंगोत्री यांनी व्यक्त केली. नवनियुक्त अध्यक्षा हरकिरणकौर धामी यांनी पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. ज्योती कलानी यांच्याशी संपर्क साधला असता आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश घेणार नसून, केवळ शहरवासीयांची सेवा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. ओमी कलानी आणि महापौर पंचम कलानी दोघेही राजकीय भूमिका घेण्याइतपत परिपक्व असल्याचे सांगून, त्याबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
राष्ट्रवादीला मोठा धक्का
माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का दिला होता. आ. ज्योती कलानी या कट्टर नाईक समर्थक म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असली तरी, अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मात्र, नाईकांपाठोपाठ त्यादेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, राष्ट्रवादी काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.