महापालिका सहायक आयुक्तासह तिघांना २५ हजाराची लाच घेताना अटक
By सदानंद नाईक | Published: September 6, 2022 10:56 PM2022-09-06T22:56:26+5:302022-09-06T22:57:30+5:30
हिललाईन पोलीस ठाण्यात महापालिका सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी, मुकादम रतन जाधव व विकास तेजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील मोडकळीस आलेल्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी २५ हजाराची मागणी करणाऱ्या सहायक आयुक्तासह तिघांना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर, त्यांनी अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू केली. मात्र त्यानंतर पाडकाम कारवाई थांबल्याने अनेक तर्कवितर्क काढण्यात येत होते. दरम्यान १८ ऑगस्ट रोजी कॅम्प नं-५ येथील मोडकळीस आलेल्या बांधकामाला परवानगी मागण्यासाठी तक्रारदाराने प्रभाग समिती क्रं-४ च्या कार्यालयात अर्ज केला. सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी, मुकादम रतन जाधव, विजय तेजी यांनी बांधकामाची स्थळ पाहणी केली. यावेळी बांधकाम परवानगी देण्यासाठी ३० हजाराचा लाचेची मागणी तक्रारदारकडे केली. तक्रारदार याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्यात ३० हजारा ऐवजी २५ हजारावर तडजोड झाली. मंगळवारी दुपारी २५ हजार रुपये घेतांना महापालिका मुकादम रतन जाधव व विकास तेजी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
हिललाईन पोलीस ठाण्यात महापालिका सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी, मुकादम रतन जाधव व विकास तेजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी यांचा हिललाईन पोलीस शोध घेत आहे. शहरात अवैध बांधकामे सर्रासपणे होत असून महापालिका परवाना नामफलक लावूनही बिनधास्त अवैध बांधकामे होऊनही प्रभाग समिती कार्यालय व महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख याबाबत काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही प्रभाग समिती क्रं-२ च्या सहायक आयुक्तसह दोघांना लाच घेतांना अटक झाली होती.