उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून रस्त्यातील खड्ड्याची पाहणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By सदानंद नाईक | Published: July 16, 2024 07:14 PM2024-07-16T19:14:59+5:302024-07-16T19:15:37+5:30
उल्हासनगर महापालिका आयुक्त अझीझ शेख यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली असता, बुझविण्यात आलेले खड्डे जैसे थे झाल्याचे दिसले.
उल्हासनगर : शहरातील रस्त्यातील खड्ड्याची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी खड्याबाबत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी स्थायी समिती सभागृहात याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, अधिकारी व ठेकेदारांना जबाबदार धरल्याने, बैठक वादळी ठरली आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अझीझ शेख यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली असता, बुझविण्यात आलेले खड्डे जैसे थे झाल्याचे दिसले. याप्रकाराने आयुक्तांनी अधिकारी व ठेकेदाराकडे नाराजी व्यक्त केली. कॅम्प नं-३, काजल पेट्रोल पंप रस्त्यावर एका ट्रकचे चाक रस्त्यात रुतले होते. तर सोमवारी रस्त्यातील खड्ड्याने एक टेम्पो पलटी झाला. तर लहान मोठे मोटरसायकल अपघात नेहमीचे झाले आहे. आयुक्त अजीज शेख यांनी स्थायी समिती सभागृहात मंगळवारी घेतलेल्या विशेष बैठकीला बाधंकाम विभागाचे अभियंता तरुण सेवकांनी यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनिष हिवरे, दत्तात्रय जाधव, अनिल खतुरानी, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, लेखा परिक्षक शरद देशमुख आदीजन उपस्थित होते.
महापालिका आयुक्तांना बुझविण्यात आलेल्या खड्ड्याच्या जागी पुन्हा खड्डे पडल्याचे निदर्शनात आल्याने, त्यांनी खड्डे बुझविण्याच्या साहित्यात बदल करण्याचे बैठकीत अधिकाऱ्यांना सुचवून खडे बोल सुनविले. तसेच शहरामध्ये एमएमआरडीए मार्फत ७ रस्त्यांचे काम सुरु आहे. मात्र रस्त्याच्या एका बाजूचे काम झाले असून दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट असल्याने, शहरात रस्त्याची समस्या निर्माण झाली. या अर्धवट रस्त्यांच्या ठिकाणी पाणी व चिखल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर उपाय म्हणून एमएमआरडीए प्रमुखांना पत्र पाठवून रस्त्याचे काम जलद करण्याचे सुचवा. असेही निर्देश आयुक्तांनी दिले. १६ ते ३१ जुलै दरम्यान सिंधी समाजाचा चालीया उत्सव सुरु होत असल्याने, रस्ते दुरुस्तीचे आदेश यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.