ऐन कोरोनाकाळात उल्हासनगर मनपा आयुक्त सुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:37+5:302021-04-02T04:42:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, उल्हासनगर मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी सुटीवर गेले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, उल्हासनगर मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी सुटीवर गेले आहेत. त्यामुळे शहरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मागील महिन्यात आयुक्तांच्या बदलीची चर्चा झाली होती. तेव्हा नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक आयुक्त संजय काकडे यांचे नाव संभाव्य आयुक्त म्हणून घेतले जात होते. आता तर सुटीतच त्यांची बदली होणार असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयएएस दर्जाचे व स्वतः डॉक्टर असलेल्या दयानिधी यांची गेल्यावर्षी आयुक्तपदी नियुक्ती झाली. सुरुवातीला त्यांनी विविध उपक्रम राबवून रुग्णसंख्या आटोक्यात आणली. त्यामुळे त्यांचे कौतुक झाले. मात्र, शहरातील विकासकामांची पाहणी, महापालिका उत्पन्नात वाढ, बांधकामे नियमित करण्याची ठप्प असलेली प्रक्रिया, बेकायदा बांधकामांविरोधात न होणाऱ्या कारवाया, इतर उत्पन्नांचे ठप्प असलेले स्रोत, मनपाच्या विविध विभागांतील सावळागोंधळ आदींमुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दयानिधी ५ एप्रिलपर्यंत सुटीवर गेले आहेत. आयुक्तपदाचा प्रभारी पदभार त्यांनी अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. यानिमित्ताने, सुटीदरम्यान आयुक्तांची बदली होणार असल्याची चर्चा पुन्हा मनपा वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, मनपात वर्ग-१ व २ ची ९० टक्के पदे रिक्त असून, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वर्ग-१ व २ चा पदाचा पदभार दिल्याने, विविध विभागांत सावळागोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे.
मनपा विभागात सावळागोंधळ?
डॉ. राजा दयानिधी यांच्या रूपाने आयएएस दर्जाचा आयुक्त मिळाल्याने, मनपातील सावळागोंधळ कमी होईल. तसेच शहराची वाटचाल विकासाकडे होईल, असे बोलले जात होते. मात्र, नागरिकांच्या आशा-आकांक्षा काही दिवसांत धुळीस मिळाल्या. दयानिधी यांचा मनपा प्रशासनावर वचक नसल्याची टीका झाली. शेकडो बेकायदा बांधकामे होऊनही पाडकामाचे आदेश त्यांनी दिले नाही.
-------------------