उल्हासनगर पालिका आयुक्तांनी घेतला नालेसफाईचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:31 PM2019-06-06T23:31:21+5:302019-06-06T23:31:27+5:30
प्रशासनाचा दावा : मोठ्या नाल्यांची ७० टक्के सफाई, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतली माहिती
उल्हासनगर : नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता शहरातील विविध भागांतील साफसफाईची तसेच पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी आदी उपस्थित होते.
उल्हासनगरला स्वच्छ व सुंदर करण्याचा ध्यास आयुक्त देशमुख यांनी घेतला आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कामाची पद्धत समजून घेतली.
स्वच्छता अभियानांतर्गत दररोज केल्या जाणाºया साफसफाईच्या व पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाºया नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्याकरिता गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शहरातील विविध भागांची पाहणी केली. शिवाजी चौक व कॅम्प नं.-३ परिसरातील लहानमोठ्या नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. यावेळी अधिकाºयांना सूचना दिल्या.
वर्षातून तीनवेळा नालेसफाई होणार असून लहान नाल्यांच्या सफाईसाठी दररोज ३०० कामगार एकूण ४० दिवसांसाठी तैनात केल्याची माहिती उपायुक्त व जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली. नालेसफाईवर साडेतीन कोटींचा खर्च होणार आहे. मोठ्या नाल्यांची ७० टक्के सफाई झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून झाला असला, तरी अनेक नाले तुंबलेल्या अवस्थेत आहेत. नाल्यांतून काढलेला गाळ अनेक ठिकाणी नाल्यांच्या काठावर ठेवलेला आहे. तो तातडीने उचलण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्तांनी केलेल्या पाहणीचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. कारभारात शिस्त आणावी अशी अपेक्षा आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणाºया वालधुनी नदीचे पात्र अरुंद व उथळ झाले असून ते खोल व रुंद करण्याची मागणी होत आहे. तीच परिस्थिती मोठ्या नाल्यांची आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्यास, पाणी तुंबून सखल व झोपडपट्टी भागात जाण्याची भीती स्थानिक नागारिकांनी व्यक्त केली. पालिकेने नाल्याच्या सफाईसह नाल्यांची रुंदी व खोली मोठी करणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक गजानन शेळके यांनी व्यक्त केले.