उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी घेतला पावसाळीपूर्व कामाचा आढावा
By सदानंद नाईक | Published: May 7, 2024 08:01 PM2024-05-07T20:01:22+5:302024-05-07T20:03:42+5:30
लहान-मोठ्या नाल्याची होणार सफाई
उल्हासनगर: महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी विभाग प्रमुखांची बैठक बोलावून पावसाळीपूर्व कामाचा आढावा घेतला. लहान-मोठ्या नाल्याची सफाई, रस्ता दुरुस्ती, अर्धवट विकास कामे पूर्ण करणे आदिवर बैठकीत चर्चा झाली आहे.
उल्हासनगरात भुयारी गटार योजना व रस्त्याचे काम सुरू असल्याने, बहुतांश रस्ते खोदलेले आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत निर्णय घेणे, लहान-मोठे नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामाला प्राधान्य देणे, आदी कामाबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्यासह विभाग प्रमुखांची बैठक मंगळवारी बोलाविली होती. बैठकीत पावसाळ्यापूर्वी लहान-मोठ्या नाल्याच्या सफाईवर भर देण्यात आला. तसेच शहर कचरा मुक्त करून जंतूनाशके खरेदी करणे, रस्ते दुरुस्ती, धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण व उपाययोजना करणे, डीप क्लिंनिगवर भर देण्याचे ठरले आहे. तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाकडून डेंग्यू, मलेरिया इत्यादी साथरोग नियंत्रणाबाबत आवश्यक ती कार्यवाई करणे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहयोगाने पूर्ण करणे, औषधे खरेदीस मान्यता देऊन निविदा मागविणे, आदी निर्णय घेण्यात आले.
महापालिका बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम त्वरीत पूर्ण करणे, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून सदरची झाडे वृक्ष अधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांचे निर्देशनास आणून देऊन तोडण्यात अथवा छाटण्यात मान्यता देणे, प्रभाग समिती निहायचे अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून उपाययोजना करणे, अतिधोकादायक इमारतीस नोटीस बजावून निष्कासनाची कार्यवाही करणे, आदी निर्णय बैठकीत झाल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, सहायक आयुक्त गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव, अनिल खतुरानी, मनिष हिवरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, यांच्यासह श्रध्दा बाविस्कर, निलम कदम, विनोद केणे, तरुण सेवकानी, दिप्ती पवार, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.