उल्हासनगर महापालिकेची प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई; लाखोंचा दंड वसूल, प्लास्टिक जप्त
By सदानंद नाईक | Published: September 5, 2023 07:38 PM2023-09-05T19:38:31+5:302023-09-05T19:38:52+5:30
शहर प्लास्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.
उल्हासनगर: शहर प्लास्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या विरोधात कारवाई करून लाखोंचा दंड वसूल करून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त दिपक जाधव, आरोग्य व सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांच्या पथकाने मंगळवारी प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तुचे वापर, उत्पादन, विक्री, हाताळाणी, वाहतुक, साठवणूक करणारे विरोधात दंडात्मक कारवाई केली. महापालिका पथकाने १ लाखा पेक्षा जास्त दंडात्मक कारवाई करून १२३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
शहरात प्रतिबंधित प्लास्टिक व थर्मोकोल वापरणाऱ्या सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत महापालिकेने दिले. प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्यांची माहिती देण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी नागरिकांना केले आहे. मात्र प्रत्यक्षात मोठे प्लास्टिक पिशव्या विक्रेते, प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई कधी? असा प्रश्न जागृत नागरिकांकडून होत आहे. लहान दुकानदार, हातगाडीचालक यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र मोठे मासे यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे पालिकेला विचारला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्लस्टिक पिशव्या बनविणारे कारखानें व मोठे विक्रेते उल्हासनगरात असल्याचे बोलले जात आहे.