उल्हासनगर महापालिकेचे मतदार जनजागृतीसाठी पुस्तक प्रदर्शन
By सदानंद नाईक | Published: April 28, 2024 07:57 PM2024-04-28T19:57:32+5:302024-04-28T19:57:49+5:30
प्रदर्शनात ५० हजार पुस्तके.
उल्हासनगर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मतदार जनजागृतीसाठी महापालिकेने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. १ ते ३ मे दरम्यान ३ दिवसाचे पुस्तक प्रदर्शन सिंधू भवन येथे असून प्रदर्शनात ५० हजार पुस्तके ठेवले जाणार आहेत.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून मतदार जनजागृतीसाठी कॅम्प नं-३ येथील सिंधू भवनात पुस्तक प्रदर्शन हा नाविन्यपूर्ण उपक्रम १ मे रोजी महाराष्ट्र दिनी राबविण्यात येत आहे. पुस्तक प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना १० टक्के तर ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र असेल त्यांना २० टक्के सवलत् मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली. मात्र ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे. त्याची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष या पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. या कक्षात मतदान ओळखपत्राची प्रक्रीया सुरु केल्यास त्या वाचकाला देखील अतिरिक्त १० टक्के सवलतीचा लाभ पुस्तक खरेदीवर घेता येणार आहे.
महापालिकेच्या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतली जाणार आहे. त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत. मतदार जनजागृती करीत असतानाच उल्हासनगर महापालिकेतील बालकांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी ही विशेष उपक्रम या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केला जाणार आहे. हे पुस्तक प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. पुस्तक प्रदर्शनास आपण भेट द्यावी. असे आवाहन आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सर्व नागरिकांना केले आहे. ५० हजारपेक्षा जास्त मराठी, इंग्रजी, हिंदी व सिंधी पुस्तके या प्रदर्शनात असणार आहे.