अजबच! उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाकडे रस्त्याची माहितीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 07:11 PM2021-10-23T19:11:34+5:302021-10-23T19:12:17+5:30
महापालिका दरवर्षी ४० कोटी पेक्षा जास्त निधी रस्त्याच्या पुनर्बांधणीवर खर्च करीत असताना रस्त्याची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याने, विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका होत आहे. यापूर्वी रस्त्याची पुनर्बांधणी कोणत्या आधारावर केली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
उल्हासनगर : महापालिका बांधकाम विभागाकडे शहरातील रस्त्याची माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विभागाचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी याबाबत कबुली दिली. दरवर्षी ४० कोटी पेक्षा जास्त खर्च रस्त्यांवर होत असताना विभागाकडे सविस्तर माहिती नसल्याने, बांधकाम विभागावर टीकेची झोळ उठली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे क्षेत्रफळ जेमतेम १३ की.मीटरचे असून शहरात एकून १६५ की.मी. लांबीचे रस्ते असल्याची माहिती विभागाकडून सांगितले जात होती. तसेच ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे तर ३० टक्के रस्ते डांबरीकरणाचे असल्याची माहिती विभागाकडून आजपर्यंत दिली जात होती. दरम्यान विभागाचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी शहरातील रस्त्याची माहिती शहर अभियंता व कार्यकारी अभियंता महेश शितलानी, अभियंता अश्विनी आहुजा, तरुण सेवकांनी, संदीप जाधव यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्याकडे मागितली. मात्र अद्यापही विभागाने रस्त्याची सविस्तर माहिती दिलेली नाही. मग कोणत्या आधारे रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली जाते. याबाबत सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.
महापालिका बांधकाम विभागाने गेल्याच आठवड्यात तब्बल १७ कोटीच्या निधीतून रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले. तसेच बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते, नाले दुरुस्ती आदीच्या कामाचे ६० कोटी पेक्षा जास्त किमंतीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यातील काही कामांच्या निविदा निघाल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात सत्ताधारी शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन एमएमआरडीएने दिलेल्या १०० कोटी पेक्षा जास्त निधीतून शहरातील विविध रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची माहिती दिली होती. तसेच महापालिका दरवर्षी ४० कोटी पेक्षा जास्त निधी रस्त्याच्या पुनर्बांधणीवर खर्च करीत असताना रस्त्याची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याने, विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका होत आहे. यापूर्वी रस्त्याची पुनर्बांधणी कोणत्या आधारावर केली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.