उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागात शुकशुकाट; अधिकाऱ्यांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
By सदानंद नाईक | Updated: March 10, 2025 19:11 IST2025-03-10T19:10:43+5:302025-03-10T19:11:03+5:30
जाधव सुट्टीवर तर सेवकांनी प्रभाग समिती कार्यालयात बदली झाल्याने, विभागात शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागात शुकशुकाट; अधिकाऱ्यांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका बांधकाम विभागा अंतर्गत शेकडो कोटीच्या निधीतून विकास कामे सुरु असून विभागात उपअभियंता संदीप जाधव व कनिष्ठ अभियंता तरुण सेवकांनी असे दोनच पदे कायम तर इतर पदे कंत्राटी तत्वावर आहेत. जाधव सुट्टीवर तर सेवकांनी प्रभाग समिती कार्यालयात बदली झाल्याने, विभागात शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. अखेर जाधव सुट्टीनंतर सोमवारी कामावर रुजू झाले.
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाचे शहर अभियंता तरुण सेवकांनी यांची आयुक्तानी मूळ पदावर बदली केली. तर विधुत विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत खराते यांच्याकडे शहर अभियंता पदाचा पदभार दिला. सेवकांनी हे प्रभाग समिती कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. तर खराते हे विधुत विभागाचे कार्यकारी अभियंता असल्याने, त्यांना बांधकाम विभागाचा तांत्रिक निर्णय घेता येत नाही. एकमेव उपअभियंता असलेले संदीप जाधव हे तब्येतीच्या कारणास्तव सुट्टीवर होते. ते सोमवारी सेवेत रुजू झाल्याने, विभागातील मरगळ काही प्रमाणात कमी झाली असून नियुक्त केलेल्या कंत्राटी अभियंत्यांना कोणताही अधिकार नाही.
शहरांत शेकडो कोटीच्या निधीतून विकास कामे सुरु असून अपुऱ्या अभियंता पदामुळे त्यावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न उभा ठाकला आहे. दोन अभियंतावर बांधकाम विभागाचे काम चालूच कसे शिकते? असा प्रश्न राजकीय नेते व नागरिकांना पडला. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शासनाकडे विविध शासन नियुक्त पदासाठी पाठपुरावा केला. तर एकूण १४६ पदासाठी लवकरच भरती घेण्याचे संकेत दिले. बांधकाम विभागा प्रमाणे पाणी पुरावठा विभागात अभियंता पदाची पदे अपुरी असून त्याचा विकास कामावर परिणाम झाला. हातांच्या बोटावर मोजले जाणारे अभियंता पदे असताना त्यांच्यातील अंतर्गत वादही अनेकदा चव्हाट्यावर आले आहे. भुयारी गटार योजनेमुळे रस्त्याची चाळण झाली असून अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. शहर विकासासाठी रिक्त अभियंता पदे कायम स्वरूपी भरण्याची मागणी होत आहे.