उल्हासनगर महापालिकेला शहर अभियंता पद मिळेना, तरुण सेवकांनीकडे प्रभारीभार
By सदानंद नाईक | Updated: May 27, 2024 18:27 IST2024-05-27T18:27:26+5:302024-05-27T18:27:35+5:30
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहर अभियंता पदी नियुक्ती केलेले संदीप जाधव गेल्या एका महिन्यापासून वैधकीय रजेवर आहेत.

उल्हासनगर महापालिकेला शहर अभियंता पद मिळेना, तरुण सेवकांनीकडे प्रभारीभार
उल्हासनगर : शहरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू असताना, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर शहर अभियंता पद गेल्या ३ वर्षांपासून दिले जात नसल्याने, विकास कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. प्रभारी शहर अभियंता संदीप जाधव हे वैधकीय रजेवर गेल्यावर शहर अभियंता पदाचा पदभार तरुण सेवकांनी यांच्याकडे देण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ४ सहायक आयुक्त, विधी अधिकारी, वैधकीय अधिकारी, शिक्षण प्रशासन अधिकारी यांच्यासह महत्वाचे पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहर अभियंता पदी नियुक्ती केलेले संदीप जाधव गेल्या एका महिन्यापासून वैधकीय रजेवर आहेत. शहर अभियंता पदाचा पदभार तरुण शेवकांनी यांच्याकडे देण्यात आला. सेवकांनी शहर अभियंता पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्याचे संकेत दिले. तसेच भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. गटारीची पाईप टाकण्यासाठी खोडण्यात आलेली रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश सेवकांनी यांनी ठेकेदाराला दिले.
शहरात १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ते, ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजना, १२६ कोटीच्या निधीतील पाणी पुरवठा योजना, ४५ कोटीच्या निधीतून मूलभूत सुखसुविधा अंतर्गतील विविध विकास कामे, शासन निधीतील कोट्यवधींची कामे असे एकून १ हजार कोटी पेक्षा जास्त विकास कामे शहरात सुरू आहेत. या विकास कामावर लक्ष ठेवण्यासाठीचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने, विकास कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.