उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 04:34 PM2020-07-03T16:34:38+5:302020-07-03T16:34:44+5:30
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून १५ पेक्षा अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर विभागात कर निरीक्षक पदावर असलेल्या परशुराम गायकवाड यांचा कोरोनाच्या संसर्गाने मुर्त्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबांनी केला असून कामगार संघटनेने विमा कवच व नुकसानभरपाई देण्याची मागणी पालिका आयुक्तांना केली.
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून १५ पेक्षा अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी मालमत्ताकर विभागात कर निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या परशुराम गायकवाड यांचा बुधवारी मृत्यू झाला. यापूर्वीही महापालिका वाहन विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे. परशुराम गायकवाड हे अंबरनाथ येथे राहायला होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यावर त्यांना उल्हासनगर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
उपचारादरम्यान तब्येत बिघडल्याने कुटुंबाला न सांगता रुग्णालयाने परस्पर मध्यवर्ती रुग्णालयात पाठविल्याचे कुटबाने सांगितले. मध्यवर्ती रुग्णालयाने ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविले. ठाण्याहून त्यांना उल्हासनगरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. उपचारा दरम्यान गायकवाड यांचा मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे. महापालिका कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे व दिलीप थोरात यांनी पालिका आयुकतांकडे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला केंद्र शासनाचा विमा कवच लागू करा व नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनद्वारे केली आहे.
शहरात कोरोना रुग्णाची संख्या २२०० पेक्षा जास्त झाली असून महापालिका आरोग्य सुविधावर प्रचंड ताण पडला आहे. मध्यवर्ती रुग्णालयातील २५ पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना किरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात भीतीचे वातावरण आहे. तसेच वाढते रुग्ण संख्येमुळे खाजगी रुग्णालय व महापालिका वास्तूचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्याची मागणी होत आहे. तसेच कोरोना संसर्ग झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांना लवकर उपचार द्यावे. अशी मागणी होत आहे.