उल्हासनगर महापालिका आक्रमक भूमिकेत; १४ मालमत्ता थकबाकीदारांना जप्तीचा इशारा
By सदानंद नाईक | Published: July 5, 2024 05:15 PM2024-07-05T17:15:32+5:302024-07-05T17:19:02+5:30
गेल्या आठवड्यात १४ मालमत्ताना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून कर थकबाकी न भरल्यास मालमत्ता लिलाव करण्याचा इशारा दिला आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत मालमत्ता कर न भरणाऱ्यावर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला. गेल्या आठवड्यात १४ मालमत्ताना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून कर थकबाकी न भरल्यास मालमत्ता लिलाव करण्याचा इशारा दिला आहे.
उल्हासनगरात एकून १ लाख ८३ हजार १३८ करमूल्य मालमत्ता असून त्यापैकी वाणिज्य व धर्मादाय संस्थेच्या ४४ हजार २१८ मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ रुपये एकून थकीत मालमत्ता कर बाकी आहे. तर चालू वर्षाचा मालमत्ता कर ११७ कोटी, ८० लाख ९४ हजार ४३ रुपये आहे. थकबाकी मालमत्ता पैकी फक्त १५ मालमत्ताधारकाकडे तब्बल ७३ कोटी ५१ लाख ६१ हजार २५ रुपये थकबाकी आहे. एकून ९३६ कोटीची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली असून गेल्या आठवड्यात थकबाकीदारक १४ मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन जप्तीचा इशारा दिला आहे.
शहरात हजारो कोटींची विकास कामे सुरू असून त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. महापालिकेकडे मालमत्ता व पाणीपट्टी कर, शासन जीएसटी अनुदान हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. गेल्या वर्षी दोन वेळा अभय योजना लागू केल्याने विक्रमी १४० कोटींची मालमत्ता कर वसुली झाली होती. यावर्षी मात्र विधानसभा निवडणुका येत असल्याने, अभय योजनेची शक्यता कमी आहे. चालू वर्षी १५० कोटींच्या वसुलीचे टार्गेट असल्याची प्रतिक्रिया अप्रत्यक्ष अधिकारी देत आहेत. तर नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर बिल भरून शहर विकासाला हातभार लावण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले. थकीत मालमत्ता कर नागरिकांनी वेळेत न भरल्यास महापालिका मालमत्ता कर विभाग अश्या मालमत्ताना नोटिसा, त्यानंतर जप्ती व नंतर मालमत्तेचा लिलाव अशी कारवाई करणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिले आहे. महापालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे थकीत मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.