उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, पालिकेच्या चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 05:55 PM2020-06-22T17:55:39+5:302020-06-22T21:04:41+5:30
गेल्या आठवड्यात मध्यवर्ती रुग्णालयातील ३ वैद्यकीय अधिकारी व ८ इतर कर्मचाऱ्यांना कोरोणाचां संसर्ग झाल्याने खळबळ उडाली.
उल्हासनगर : महापालिका सहायक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, दोन अभियंता यांच्यासह २ सफाई कामगार यांना कोरोनाची लागण झाली, तसेच २० पेक्षा कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पालिका सहायक आयुक्त मनीष हिवाळे यांनी दिली आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या एक हजार पेक्षा जास्त झाली असून कोरोना युद्धा म्हणून काम करणारे महापालिका सहायक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छ ता निरीक्षक, अभियंता व दोन सफाई कामगारांना कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले. तर २० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी यांना सावधगिरीचा उपाय म्हणून क्वारंटाईन केले. याचा परिणाम कामकाजावर होत असल्याने महापालिका समोर नवाच पेचप्रसंग उभा ठाकला.
महापालिकेत अधिकारी व कर्मचारी यांची संख्या अपुरी असतानाही आयुक्त समीर उन्हाळे हे प्रभारी अधिकारी यांच्या कडून कोरोनचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्र दिवस काम करीत आहेत. मात्र काही दिवसापासून अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या आठवड्यात मध्यवर्ती रुग्णालयातील ३ वैद्यकीय अधिकारी व ८ इतर कर्मचाऱ्यांना कोरोणाचां संसर्ग झाल्याने खळबळ उडाली. संसर्गितांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून इतर डॉक्टर व कर्मचाऱ्याचत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच विविध गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने पोलिसांचे दणाणले आहे.
उल्हासनगर पोलिसांनी गेल्या आठवड्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना मध्यरात्री अटक केली. त्याच प्रमाणे हिललाईन पोलिसांनी मलंगगड परिसरातील एका खुन प्रकरणात ६ आरोपींना अटक केली . त्यापैकी ३ आरोपींना कोरोनाचां संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच संपर्कातील आरोपी व पोलिसांना अद्याप क्वारंटाईन करण्यात आले नसल्याने पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली. एकूणच पालिका, पोलिस व आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शांतीनगर येथील रुग्णालयाचे उद्घाटन झाले. मात्र दुसऱ्याच दिवसी रुग्णांकडून अनामत रक्कम मागितल्याने शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीकेची झोड उठली. मनसेने याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यावर पालिका यंत्रणा हलली. महापालिकेने ५१ लाख रुपये रुग्णालयात सुख सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खर्च केले आहे. यामध्ये शहर राष्ट्रवादीने उडी घेत संबंधितावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.