उल्हासनगर महापालिकेची रेकॉर्डब्रेक ११७ कोटी मालमत्ता कर वसुली, अभय योजनेच्या ११ दिवसात ४३ कोटीची वसुली
By सदानंद नाईक | Updated: March 7, 2025 20:05 IST2025-03-07T20:04:55+5:302025-03-07T20:05:11+5:30
Ulhasnagar Municipal Corporation News: उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेच्या पहिल्या ११ दिवसात तब्बल ४३ कोटीची वसुली झाली. तर एकूण ११७ कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली झाली असून यापूर्वी ११२ कोटीची सर्वाधिक वसुलीचा रेकॉर्ड होता.

उल्हासनगर महापालिकेची रेकॉर्डब्रेक ११७ कोटी मालमत्ता कर वसुली, अभय योजनेच्या ११ दिवसात ४३ कोटीची वसुली
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेच्या पहिल्या ११ दिवसात तब्बल ४३ कोटीची वसुली झाली. तर एकूण ११७ कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली झाली असून यापूर्वी ११२ कोटीची सर्वाधिक वसुलीचा रेकॉर्ड होता.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागासाठी शेवटची व अंतिम अभय योजना असल्याचे सांगून अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. अभय योजनेचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होता. पहिल्या टप्प्यात थकबाकीची एकत्रित रकम भरल्यास त्यावरील १०० टक्के दंड व व्याज माफ केले. दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च असून दुसऱ्या टप्प्यात थकबाकीची एकत्रित रक्कम भरल्यास ७५ टक्के दंड व व्याज माफ केले जाणार आहे. तर तिसऱ्या टप्पा १३ ते १६ मार्च असून थकबाकीची एकत्रित रक्कम भरल्यास ५० टक्के दंड व व्याज माफ केले जाणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ११ दिवसात तब्बल ४३ कोटीची वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, अजय साबळे आदिनी अभय योजना यशस्वीपणे राबविल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक ११२ कोटीच्या वसुलीचा रेकॉर्ड होता. गेल्या वर्षीचा सर्वाधिक वसुलीचा रेकॉर्ड यावर्षी मोडीत निघाला असून मार्च अखेर १५० कोटीची वसुलीची शक्यता व्यक्त होत आहे. अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी भरभरून सहकार्य दिले. असेच सहकार्य योजनेच्या पुढील दोन टप्प्यात देण्याचे आवाहन आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी केले. त्यानंतर थकबाकीदारकावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे संकेतही आयुक्तानी दिले.