उल्हासनगर महापालिकेने ३ वर्षात ११ जणांना केले बडतर्फ, ४६ कर्मचारी होते बेपत्ता
By सदानंद नाईक | Published: February 21, 2024 09:13 PM2024-02-21T21:13:38+5:302024-02-21T21:14:12+5:30
उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती.
उल्हासनगर : बोगस कागदपत्र व बेपत्ता झालेल्या तब्बल ११ कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षात महापालिकेने बडतर्फ केल्याचा प्रकार उघड झाला. तर लाड-पागे वारसाहक्क नियुक्ती धोरणानुसार धनदांडग्यांनी गरीब व गरजू सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या लाटल्याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली असून कारवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती. अखेर तक्रारीनंतर महापालिकेने चौकशी केली असता, एका अधिकाऱ्यांसह दोन सफाई कामगार दोषी आढळले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी त्यांना बडतर्फ केले. त्यापाठोपाठ महापालिका आरोग्य विभागातील तब्बल ४६ सफाई कामगार काही वर्षांपासून गैरहजर असल्याचे उघड झाल्यावर, महापालिकेने त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली. ४६ पैकी सुरवातीला २६ तर त्यानंतर ९ सफाई कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा व शोध लागल्यावर त्यांना महापालिका सेवेत रुजू होण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना जेजे रूग्णालय कडून फिटनेस प्रमाणपत्र आणण्याची अट घातली होती. फिटनेस सर्टिफिकेट आणल्यावर, त्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेतल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
महापालिकेच्या ४६ पैकी ३५ सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेतले असून त्यांच्या गैरहजरीचा कालावधी सेवाप्रयोजनार्थ लागू होणार नाही. तसेच त्या गैरहजर कालावधीचा सफाई कामगारांना कोणताही शासन लाभ मिळणार नसल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. ४६ पैकी इतर राहिलेल्या ११ कर्मचारी व अधिकाऱ्यां पैकी १ अधिकारी व २ सफाई कामगारांचे शालेय कागदपत्र बनावट असल्याचे उघड झाल्यावर, त्यांना महापालिका सेवेतून बडतर्फ केले. तर ८ सफाई कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. महापालिकेने अश्या बेपत्ता सफाई कामगार व नातेवाईकांचा शोध घेऊन वृत्तपत्रात जाहिरातीही दिल्या होत्या. बेपत्ता झालेले सफाई कर्मचारी गेल्या ९ वर्षापासून जास्त कालावधी पासून गैरहजर असून त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांनी महापालिकेसोबत एकदाही संपर्क केला नसल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी माहिती दिली आहे.
लाड-पागे वारसाहक्क नोकऱ्या वादात? -
महापालिकेने ३ वर्षांपूर्वी लाड-पागे वारसाहक्क धोरणानुसार केलेल्या असंख्य नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. वारसाहक्कनुसार केलेल्या नियुक्त्या रक्ताचे व जातीचे कोणतेही नाते नसतांना धनदांडग्यांनी लाटल्या असून कामगारांचे खरे वारसदार महापालिका भोवती नोकरीसाठी चपला झिजवीत आहेत.