उल्हासनगर महापालिकेच्या ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी, कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:32 PM2022-03-16T19:32:46+5:302022-03-16T19:33:16+5:30
आयुक्तांनी स्थायी समिती सभापतीला सादर केलेल्या अंदाजपत्रका पेक्षा दुपट्ट ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकाला बुधवारी महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
सदानंद नाईक
आयुक्तांनी स्थायी समिती सभापतीला सादर केलेल्या अंदाजपत्रका पेक्षा दुपट्ट ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकाला बुधवारी महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. ८ लाख शिल्लकीचा असलेल्या अंदाजपत्रकात इलेक्ट्रिकल बस, विधुतदाहिनी, नवीन मार्केट, महिला शौचालय, सेमी इंग्रजी शाळा आदी विकास कामाचा यामध्ये समावेश करण्यात आला.
उल्हासनगर महापालिका महासभेत स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी सन २०२२-२३ वर्षीचा स्थायी समितीने मंजूर केलेला ८९८. ५० कोटीचे अंदाजपत्रक महासभेत सादर केले. महासभेत यामध्ये सुधारणा करून ११८९.५० कोटीचे उत्पन्न व ११६९.४२ कोटीचे खर्च असा ८ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रकाला सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. यापूर्वी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी ५२३.२० कोटीचे उत्पन्न तर ५२२.४२ कोटींचा खर्च असा ७८ लाखाचा शिलकी अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांना यापूर्वी सादर केला होता. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात दुप्पट वाढ करण्यात आल्याने, अंदाजपत्रकातील आकडे फुगविल्याचा आरोप होत आहे. ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकातील उत्पन्ना मध्ये मालमत्ता कर-२०८ कोटी, शासन जीएसटी अनुदान २९४ कोटी, बांधकाम नियमित करणे व इतर ३८५ कोटी, नगररचनाकार विभागाकडून ९० कोटी, नवीन उत्पन्न स्रोतातून ९० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे.
तर अंदाजपत्रकातील खर्चा मध्ये कर्मचारी पगारासह प्रशासकीय खर्च १७७ कोटी, एमआयडीसी पाणी बिल ७८ कोटी, कचरा वाहतूक ६७ कोटी, रस्ते बांधणी २७० कोटी, अग्निशमन दल ३६ कोटी, शिक्षण मंडळ ४२ कोटी, कर्जपरतफेड ८.४८ कोटी, विधुत विभाग ११ कोटी, परिवहन इलेक्टरीकल बस ३० कोटी असा ११६९.४२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
अंदाजपत्रकात विशेष बाबी
कोरोना संसर्ग भविष्यात राहू शकतो असे गृहीत धरून विशिष्ट निधी, महिला व बालकल्याण विभागासाठी व दिव्यांग विभागासाठी प्रत्येकी १०, गरजू व गरीब नागरिकांसाठी १२ कोटी, शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी रस्त्यावर सौर ऊर्जा दिवे लावण्याला येणार असून इलेक्टरीकल परिवहन बस सेवा सुरू होणार आहे. सेमी इंग्रजी शाळा, महिला शौचालय, महापौर-आयुक्त निवासस्थान, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे व भुयारी गटार योजनेचा समावेश आहे.