याला म्हणतात निषेध! कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या फोटोची केली आरती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 10:24 PM2021-01-07T22:24:00+5:302021-01-07T22:24:44+5:30
उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम; सातवा वेतन लागू करण्याची मागणी
उल्हासनगर : शासनाचे आदेश असतांना महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करीत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फित्या लावून आज काम केले. शहाड फाटक परिसरात कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या फोटोला आरती करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली.
उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून शहर विकासावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. दरम्यान महापालिका कर्मचारी संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी ७ जानेवारी पर्यंत सातवा वेतन आयोग लागू न केल्यास कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांना दिला होता. ७ जानेवारीला सातवा वेतन आयोग लागू केला नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले.
महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शहाड परिसरात आयुक्तांच्या फोटोची ओवाळली आहे. जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही. तोपर्यंत कर्मचारी काळ्या फित्या लावून आयुक्तांचा फोटो ओवाळणार असल्याचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी सांगितले. संघटनेचे सहसचिव सचिन साठे, अंबादास सौदागर, संतोष साळवे, प्रदिप राजगुरू, कृष्ण पवार, बचुं कडू, रमेश वाघेला, बिरमोद महरोलीय, महेश मरुलीया, रामकीशन चौहान व इतर कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या आरती मध्ये सहभागी झाले होते.