उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली
By सदानंद नाईक | Published: May 27, 2023 05:30 PM2023-05-27T17:30:18+5:302023-05-27T17:30:52+5:30
उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथील जलकुंभाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. वेळीच जलकुंभाची दुरुस्ती केली नाहीतर, मोठा अपघात होण्याची भीती काँग्रेसचे पदाधिकारी किशोर धडके यांनी व्यक्त केली आहे.
उल्हासनगरातीलपाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. योजने अंतर्गत शहरातील जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या असून ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, बुस्टर पंप, पाणी मीटर बसविण्यात आले होते. याच योजनेतील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथे उंच जलकुंभ बांधले आहे. या जलकुंभातून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही महिन्यांपासून जलकुंभाला पाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. महापालिकेने वेळीच पाणी गळती बंद करायला हवी होती. दरम्यान काँग्रेस पक्षाचे शहर पदाधिकारी किशोर धडके यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे जलकुंभ पाणी गळती बंद करण्याची मागणी केली आहे.
शहरातील खडी मशीन येथील जलकुंभा प्रमाणे इतर जलकुंभालाही पाणी गळती लागली आहे. सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प येथील जलकुंभाची हीच परिस्थिती आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष दिले नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एकीकडे महिला पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकत असतांना, दुसरीकडे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी खाली जात आहे.